गडहिंग्लज : दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले जलदूत, आरोग्यदूत, जनमनातील आमदार अशी ख्याती असलेले आणि गोरगरीब कष्टकरी जनतेचा श्रावणबाळ म्हणून ओळखणारे डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी आज साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा....
डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यातील चंदनकुड या गावी शेतकरी कुटुंबात झाला. समाजातील गोरगरीब जनता, शेतकरी वर्गांच्या विविध समस्या त्यांनी लहानपणापासूनच पाहत आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न त्यांना कोणी सांगण्याची गरज नव्हती. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचे ठरवून समाजकारणासाठी राजकारण करण्याचा निर्णय घेतला. "निष्काम सेवा" करून गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम आजपर्यंत डॉ. व्हसकोटी अखंडितपणे करत आहेत.
डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या दिवसाची सुरुवात होते ते मुळातच समाजकार्याने. कोणाचे आजारपण असेल, कोणाला शैक्षणिक मदत हवी असेल, कुठे पाण्याची टंचाई असेल, कुठे मंदिरासाठी मदत हवी असेल, कोणाच्या कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल, एखाद्या शाळेला शैक्षणिक उठाव हवा असेल तर आपला हक्काचा माणूस म्हणून लोक डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतात. त्यांच्याकडे येणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने गेला नाही. नंदनवाड, अरळगुंडी, तुपूरवाडी, नौकूड यासह अनेक गावातून त्यांनी स्वखर्चाने कुपनलिका खोदून पाणी प्रश्न सोडवला आहे. हृदय शस्त्रक्रिया आणि मुस्लिम मुलीच्या लग्नासाठी त्यांनी मदत करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
हलकर्णी, मनवाड येथील प्राथमिक शाळांना त्यांनी वॉटर फिल्टर दिले आहेत. अनेक शाळातून विद्यार्थ्यांना गणवेश यासह शैक्षणिक साहित्य देखील त्यांनी दिले आहे. गोरगरीब जनतेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. या रुग्णवाहिकेचा पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेसाठी मोठा लाभ होत आहे. दरवर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन फुलवले आहे. बसर्गे येथील खेळाडूंना मदत करून त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. परिसरातील १४ व्यायाम शाळांना स्वखर्चाने व्यायामाचे साहित्य त्यांनी दिले आहे. तरुणांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली आहे. तेरणी येथील १४ शेतकऱ्यांचे सेवा संस्थेचे कर्ज स्वतः भरून त्यांना कर्जातून मुक्त करत त्यांचा भार हलका केला आहे. त्याचबरोबर त्यांना रेशन मिळण्याचा मार्गही मोकळा करून दिला आहे.
कोरोना काळात डॉक्टरांना पीपीई किट यासह विविध आरोग्य साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. हलकर्णीत स्मशानभूमीसाठी स्मशान शेड तर बसर्गे येथे प्रवासी निवारा शेड बांधून ग्रामस्थांची सोय केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे. परीक्षा काळात तांत्रिक बिघाडाने बस बंद पडली असता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षास्थळी पोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिर देखील आयोजित करून वैद्यकीय सेवेला हातभार लावण्याचे काम त्यांनी केले आहे. समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि मदतीचा हात सदैव पुढे असणाऱ्या अशा या व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा...!
- संतोष नाईक /गडहिंग्लज



