गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी मोफत एस.टी. पास वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम तर प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर एस. टी. महामंडळ विभागीय नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के व विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे व शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. टी. व्ही. चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात एस.टी.महामंडळ विभागीय नियंत्रक कोल्हापूरच्या श्रीमती अनघा बारटक्के यांनी एस.टी. आपल्या दारी हा उपक्रम राबवून प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच सज्ज आहे. महामंडळाच्या माध्यमातून सर्वच प्रवाशांबरोबर खास करून शिक्षणात आपले करिअर घडविणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी मोफत पास योजना राबवून प्रोत्साहन देत आहे. हे खरोखर अभिमानस्पद आहे. एस.टी. महामंडळाने दिलेल्या या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये एस.टी. महामंडळ प्रवाशांच्या सेवेत नेहमीच तत्पर आहे. एस. टी. विभागाने दळणवळणाच्या माध्यमातून जाळे विणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवाशी सेवेत त्यांनी आपला विश्वास दृढ केला आहे. एस. टी. विभागाने विद्यार्थी-विद्यार्थीनीना पास योजना राबवित आहे. त्यामुळे सर्वांनी एस. टी. मधूनच प्रवास करून प्रवासवाहिनीला आधार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले. सेवा-सवलतींचा लाभ सर्व प्रवाशांना देत आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी देखील एस.टी. सेवा सर्वांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत आहे. सर्वांच्या दृष्टीने एस.टी.चा प्रवास हा सुरक्षित व सोयीस्कर आहे याचा लाभ सर्वांनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एस. टी. वाहतूक नियंत्रक उदय काळगे, भरत चौगुले, डी. आय. सनदी, मोहन शिंदे, विना-अनुदानित ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. संदीप कुराडे, प्रा. एम. एस. घस्ती, प्रा.संजयकुमार कांबळे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. महेश चौगुले यांनी आभार मानले.


