जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचे आश्वासन
महागाव येथे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कार्यशाळा सपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा बँक उपाध्यक्षपर्यंत लोकांचे प्रतिनिधित्व करत असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी मी जवळून पाहिलेल्या आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी हे जनतेचे खरे सेवक आहेत. जर मला चंदगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, महागाई भत्ता, आरोग्य सुविधा या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आश्वासन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक आप्पी उर्फ विनायक पाटील यांनी केले.
महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालय येथे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कार्यशाळा व मेळाव्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी भिकाजी कुंभार होते. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे, प्रा.पी.डी. पाटील, ॲड. राहूल जाधव, सम्राट मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी केले. यावेळी बोलताना अप्पी पाटील पुढे म्हणाले, मी महागावचा सरपंच म्हणून काम करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार सातशे रुपये वरून बाराशे रुपये केला. प्रत्येक गावच्या प्रगतीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. कारण ते ग्रामव्यवस्थेचा कणा आहे. त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन. यावेळी प्रा. पी.डी. पाटील, ॲड. राहूल जाधव, सम्राट मोरे, बाळेश नाईक, भिकाजी कुंभार, परशराम जाधव, सुरेश मायान्नावर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत मुलांचा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व विविध ठिकाणी नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ राघोजी, तानाजी वाईगडे संजय दळवी, आजाऱ्याचे अशोक गेंगे, कशिनाथ कुंभार, सुरेश म्हंकावे, दिलिप परीट उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्जुन दिवटे यांनी केले. आभार बबन पाटील यांनी मानले.



