मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचा इशारा
उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गावर हिटणी नजीक उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर गडहिंग्लज शहराचा उल्लेख करण्यात आलेला नाही. गडहिंग्लज शहरातूनच हे महामार्ग जात असतानासुद्धा संबंधित रस्ता आस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी नाव वगळले आहे. या फलकावर गडहिंग्लज शहराचा उल्लेख तातडीने न केल्यास सदर फलकच उकडून टाकण्याचा इशारा मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 चे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही अंतिम टप्प्यातील कामे सुरू असून ठीक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. संकेश्वरनजीक असलेल्या हिटणी गावाजवळ उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर गडहिंग्लज शहराचे नाव वगळण्यात आल्याचे दिसते. संकेश्वर पासून पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या गडहिंग्लज शहरात मुख्य बाजारपेठ आहे. या शहराच्या मुख्य बाजारपेठेतून हा महामार्ग जात असून सुद्धा त्या ठिकाणच्या नावाचा उल्लेख फलकावर नसल्याचे आढळते. जाणीवपूर्वक शहराचे नाव वागळल्यामुळे नागरिकांच्यातून संतप्त भावना उमटत आहेत. परिणामी बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना गडहिंग्लज शहराचे नाव दिसत नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
या ठिकाणच्या दिशादर्शक फलकावर गडहिंग्लज शहराचे नाव संबंधित रस्ता अस्थापना अधिकारी यांना सांगून ताबडतोब समाविष्ट करावे अन्यथा मनसेच्या वतीने सदर दिशादर्शक फलक उखडून टाकण्यात येईल असा इशारा या निवेदनातून दिला आहे.

