Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या प्रस्तावित ३०० कोटींच्या कर्जाला सभासद कृती समितीची हरकत

विद्यमान संचालकांनी वैयक्तिक आणि सामुदायिक जबाबदारी स्विकारूनच कर्ज घ्यावे!


कारखाना खासगी कंपनीला चालवायला देण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा 


गडहिंग्लजला उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या स्वामी नारायण चॅरिटेबल ट्रस्ट, अहमदाबाद यांचेकडील प्रस्तावित ३०० कोटींच्या कर्जाला गडहिंग्लज साखर कारखाना सभासद कृती समितीने हरकत घेतली असून याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देत याकडे लक्ष वेधले आहे. सदर निवेदन माजी संचालक अमरसिंह चव्हाण व माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, अहमदाबाद येथील "स्वामी नारायण चॅरिटेबल ट्रस्ट " कडून कारखान्यासाठी ३०० कोटींचे कर्ज घेण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कारखान्याने ५५ कोटींचे अल्प मुदतीचे कर्ज घेतले असून उसाची बिले देण्यासाठी साखर तारण कर्जही घेतले आहे. आजमितीस दोन्ही मिळून सुमारे ९२ कोटींचे कर्ज आहे. त्याशिवाय सेवेतील कामगारांचा पगार, भविष्य निर्वाह निधीचा भरणा आणि सेवानिवृत्त कामगारांची कोट्यवधींची देणे थकीत आहेत. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाने मिळालेल्या कर्जाचा योग्य व काटकसरीने वापर करून कारखाना कर्जमुक्त व स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु, दुर्दैवाने तसे झालेले नाही व होताना दिसत नाही.



कोल्हापूर जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटींच्या कर्जाचा विनियोग नियमबाह्य झाल्याचे आणि त्याच्या चौकशीची मागणी कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह ७ संचालकांनी साखर आयुक्त व बँकेकडे लेखी स्वरुपात केली आहे. त्यानुसार कारभाराची चौकशी करून कारखान्याच्या कामकाजावर अंकुश ठेवावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.


दरम्यान, अहमदाबाद येथील " स्वामी नारायण चॅरिटेबल ट्रस्ट" कडून ३०० कोटीचे कर्ज घेण्याच्या हालचाली सुरु असून त्यासाठी कारखान्याची संपूर्ण मालमत्ता तारण ठेवली जाणार आहे. परंतु, त्या कर्जाला विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व अधिकारी आणि भविष्यात कारखान्यावर निवडून येणारे संचालक मंडळ देखील जबाबदार असणार नाही, असा उल्लेख कारखाना व ट्रस्ट यांच्या दरम्यान झालेल्या साध्या गहाणखत

करारपत्रात आहे. त्यास आमची हरकत आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटींच्या कर्जाच्या विनियोगाबद्दल विद्यमान उपाध्यक्ष व ७ संचालकांचा आक्षेप आहे. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश दिले आहेत. परंतु, तब्बल ३ महिने कारखान्याचे दफ्तरच उपलब्ध नसल्यामुळे लेखापरीक्षण होऊ शकलेले नाही , त्याचे गौडबंगालही समजत नाही. आता परराज्यातील ट्रस्टकडून ३०० कोटीचे अवाजवी कर्ज बेकायदा घेण्याचा त्यांचा खटाटोप दिसतो.



कारखान्याची मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेण्याऐवजी विद्यमान संचालकांनी वैयक्तिक आणि सामुदायिक जबाबदारी व उत्तरदायित्व स्विकारूनच कोणतेही कर्ज घ्यावे. त्या संबंधीची संपूर्ण माहिती सर्व वृत्तपत्रांच्या माध्यमातून सभासदांना जाहीरपणे द्यावी. सभासद हेच कारखान्याचे मालक असल्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच कारखान्याचा कारभार चालला पाहिजे. किमान यावर्षीपासून तरी कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप वेळेवर व्हावे, शेतकऱ्यांना ऊसाची बिले वेळेत मिळवीत. सेवेतील कामगारांचा पगार दरमहा मिळावा तसेच सेवेतील व सेवानिवृत्त कामगारांचे थकीत देणे तातडीने द्यावेत, अशी मागणीही या निवेदनातून केली आहे. 



गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील सुमारे २५,००० अल्पभूधारक शेतकरी आणि कामगारांच्या त्यागातून उभारलेला हा कारखाना सहकारात व स्वबळावरच आणि सुरळीत चालावा हीच आमची भावना आहे. त्यामुळे सभासदांना अंधारात ठेवून कर्जाची वैयक्तीक व सामुदायिक जबाबदारी टाळणाऱ्या संचालक मंडळाला सदरील कर्ज देण्यास आमची हरकत  आहे. सभासदांना गृहीत धरून भरमसाठ कर्जाचा बोजा निर्माण करून कारखाना खाजगी कंपनीला चालवायला देण्याचा त्यांचा डाव आहे. तसे झाल्यास तो हाणून पाडण्यासाठी प्रसंगी जनआंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनातून दिला आहे.





निवेदनावर अमरसिंह चव्हाण, सौ. स्वाती कोरी,  शिवाजीराव खोत,  बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, उदय कदम, श्रीपती कदम, भीमराव पाटील, अमृतराव शिंत्रे, विकास पाटील, शिवाजीराव माने यांच्यासह सभासदांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.