किट्टवडे येथील शेतकऱ्यांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु
संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा : कॉम्रेड शिवाजी गुरव
अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : माजी सभापती निवृत्ती कांबळे
आजरा : आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी आजरा तहसील कार्यालयासमोर किट्टवडे येथील सहा शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. चुकीच्या पद्धतीने मोजणी झाल्याने आमच्यावर अन्याय झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या आंदोलनस्थळी ग्राहक पंचायतीचे कॉम्रेड शिवाजी गुरव, माजी सभापती निवृत्ती कांबळे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलताना कॉम्रेड शिवाजी गुरव म्हणाले, चुकीच्या पद्धतीने मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या व वरिष्ठांनाही न जुमानणाऱ्या मोजणी कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ, मनमानी कारभाराबाबत तालुक्यामध्ये अनेक गावच्या तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मोजदाद करताना अन्याय केला जात आहे. उर्मट भाषा वापरली जात आहे. त्यामुळे सदर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी कॉम्रेड गुरव यांनी केली. भूमी अभिलेख कार्यालयाने कारभारात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सभापती निवृत्ती कांबळे यांनी देखील यावेळी दिला.
या धरणे आंदोलनात शंकर पांडुरंग पाटील, सुधाकर ईश्वर पाटील, भिकाजी रामचंद्र सावंत, जयवंत नाना पाटील, गावडू भाऊ पाटील, यशवंत नाना पाटील यांचा समावेश आहे.

