कारखाना चेअरमन यांच्या नियोजन शून्य कारभाराला कंटाळल्याचे स्पष्टीकरण
पत्रकार परिषद घेत कारखाना कारभाराची दिली माहिती
![]() |
| गडहिंग्लज : पत्रकार परिषदेत माहिती देताना गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील. शेजारी व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या नियोजन शून्य कारभाराला कंटाळून कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण यांच्यासह सहा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याने गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संचालक सतीश पाटील यांच्यासह राजीनामा दिलेल्या सहा संचालकांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मागील कांही वर्षापासून कारखान्याची होणारी दुरावस्था दुर करण्यासाठी २०२२ मध्ये झालेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये सर्व सभासद, शेतक-यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुमताने डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या हातात कारखान्याची सत्ता देत सर्व संचालकांनी डॉ. शहापूरकर यांची एकमताने चेअरमन म्हणून निवड केली. परंतु त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कारखाना पुन्हा अधोगतीकडे व कर्जच्या खाईत जात आहे. या कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.

