Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी नेहमी आई-वडील, शिक्षकांचा आदर राखावा!

कवी आनंदा आसवले यांचे प्रतिपादन 


महागाव येथील श्री शिवाजी विद्यालयात 'कवी आपल्या भेटीला' कार्यक्रम संपन्न 


कलाशिक्षक बी. डी. परितकर व डी. व्ही. सुतार यांचा विशेष सत्कार 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आई-वडिलांनंतर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे तिसरे देव मानले जातात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे फार मोठे योगदान असते. शिक्षकांनी उत्कृष्ट घडविलेल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सात पिढ्यांचे उद्धार करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी आई वडील व शिक्षकांचा आदर व सन्मान राखला पाहिजे असे प्रतिपादन कवी आनंदा आसवले यांनी केले.



 

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील महाकाली एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालयात कवी आपल्या भेटीला, काव्यवाचन, स्तुतीकाव्य भेट प्रदान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. बी. केसरकर होते. यावेळी पत्रकार संतोष नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.




प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिक्षक एम. व्ही. धनगर यांनी करून दिले. त्यानंतर शिवाजी महाविद्यालयातील कलाशिक्षक बी. डी. परितकर व डी. व्ही. सुतार यांच्यासह पत्रकार संतोष नाईक यांचा कवी आनंदा आसवले रचित स्तुती काव्य मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कवी श्री. आसवले यांनी आपल्या विविध कवितांचे विद्यार्थ्यांपुढे सादरीकरण करत सविस्तर मार्गदर्शन केले.



 

प्राचार्य एस. बी. केसरकर अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कवी आनंदा आसवले यांनी आपली नोकरी सांभाळत कवितेचा जोपासलेला छंद निश्चितच कौतुकास्पद आहे. खडतर परिस्थितीशी सामना करत घेतलेली भरारी, शिक्षणाला दिलेले महत्त्व याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा आहे. शिक्षणावरील प्रेम व शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात असणारा आदर निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.



कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक एम. बी. पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.