मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नेटाने चालविलेले गडहिंग्लजमधील 'अंधांचे रोजगार केंद्र'
एका स्वप्नपूर्तीची वर्षपूर्ती झाल्याचा कार्यकर्त्यांना आनंद
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावातून बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ ला मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा संकल्प केला व तो कृतीतही आणला. अत्याळ गावाने सुरू केलेल्या या चळवळीत परिसरातील सहा ते सात गावांसह तालुक्यातील विविध गावांनी देखील सहभाग घेतला असून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांनी नेत्रदान केल्याने या चळवळीला मोठे यश येत आहे. ही नेत्रदानाची चळवळ पुढे नेत असताना समाजातील अंध बांधवांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या हाताला एखादे काम देता येईल का? या दृष्टीने विचार करून अंध बांधवांसाठी "दीपस्तंभ" स्वयंसहायता समूह बचत गटाची स्थापना करण्यात आली. अंध बांधवांचे हे राज्यातील पहिलेच बचत गट आहे. या माध्यमातूनच गडहिंग्लज येथील कचेरी रोडवर पंचायत समितीच्या बचत भवनला लागूनच हे रोजगार केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे "अंधांचे रोजगार केंद्र" सुरू करून वर्ष झाले. या वर्षापूर्तीनिमित्त घेतलेला हा आढावा.....
२ एप्रिल २०१८ रोजी गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर येथे मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा पाचवा वर्धापनदिन कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अंध उद्योजक भावेश भाटीया यांची प्रमुख उपस्थिती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेत्रदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी अंध बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे स्वप्न पाहिले होते. नेत्रदान चळवळीतील कार्यकर्त्यांची दुहेरी ओढाताण टाळण्यासाठी आधी आय बँकेची पूर्तता करावी, असा व्यवहार्य मुद्दा चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनीलकुमार लवटे यांनी उपस्थित केला. त्यामुळे अंधांच्या रोजगार निर्मितीचा विषय थोडा लांबणीवर पडला. दरम्यान, कोरोनाच्या संकटात दोन वर्ष चळवळच ठप्प झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव संपता संपता नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांच्या अंकुर आय हॉस्पिटलमध्ये आय बँक मंजूर करून घेण्यात यश मिळाले.
पाच वर्षे सरली पण, अंधांच्या रोजगाराचे स्वप्न मागे पडले नव्हते. त्याच्या पूर्तीसाठी पहिले पाऊल पडले ते चळवळीच्या दहाव्या २९ ऑक्टोबर २०२२ वर्धापनदिनानिमित्त. स्वागत थोरात व स्वरुपा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज तालुक्यातील अंधांची दोन दिवसीय स्वयंसिद्धता कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत अंधांना आणण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले. आरोग्य विभागाचेही सहकार्य मिळाले. त्यानंतर आजरा व चंदगड तालुक्यातील अंधांसाठीही दोन स्वतंत्र स्वयंसिद्धता कार्यशाळा झाल्या. यातील निवडक अंधांना अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे आठ दिवसांचे निवासी रोजगार प्रशिक्षण शिबीर झाले.
प्रशिक्षणातून सिद्ध झालेल्या अंधांना रोजगार उपलब्ध करून देणे हीच खरी कसोटी होती. चळवळीच्या वाटचालीत जितक्या अडचणी तितके मदतीचे हात पुढे येतात हा अनुभव यावेळीही आला. गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या संवेदनशीलतेमुळे गडहिंग्लज पंचायत समितीने अंधांच्या रोजगार केंद्रासाठी कचेरी मार्गावर जागा उपलब्ध करून दिली. कार्यकर्त्यांच्या आर्थिक मदतीतून कच्च्या मालाची खरेदी झाली आणि एक वर्षांपूर्वी म्हणजेच १७ जुलै २०२३ रोजी अंधांच्या रोजगार केंद्राचा प्रारंभ झाला. चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित पाहिलेले एक स्वप्न सत्यात उतरले. अंधांचा राज्यातील पहिलाच "दीपस्तंभ" नावाचा बचत गट स्थापन झाला. त्याच नावाने उत्पादनाची निर्मिती सुरू झाली.
अंध बांधवांच्या या रोजगार केंद्रासाठी पंचायत समितीने जागा उपलब्ध करून दिली आहे. बचत गटाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या या रोजगार केंद्रात अंध बांधवांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी अंध बांधव आपल्या कौशल्याने एलईडी बल्ब, लाइटिंग माळा, चार्जिंग बल्ब, सोलरच्या विविध वस्तू उत्तम प्रकारे तयार करतात. डोळस व्यक्तीनाही लाजवेल अशा वस्तू अंध बांधव या रोजगार केंद्रात बनवतात. दीपस्तंभ या नावाखाली अंध बांधवांनी तयार केलेल्या या वस्तूंची विक्री केली जाते. नेत्रदान चळवळ करत असतानाच दुसऱ्या बाजूला अंध बांधवांनाही स्वावलंबी बनविण्याचे काम या रोजगार केंद्राच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी केले आहे.
कार्यकर्त्यांचे ऐक्य आणि समाजाच्या पाठबळावर हा प्रपंच उभा!
गेल्या वर्षभरापासून हे केंद्र नेटाने चालविले जात आहे. अंधांकडून ५ वॅटपासून ३० वॅटपर्यंतचे एलईडी बल्ब व लायटिंग माळांची निर्मिती केली जात आहे. ग्राहकांकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे. यातून सध्या आठ अंध बंधू-भगिनींना रोजगार उपलब्ध झाला आहे. अजूनही बरेच अंध रोजगार केंद्रात येण्यास उत्सुक आहेत. पण, त्यासाठी अंधांनी तयार केलेल्या एलईडी बल्ब व लायटिंग माळांची अधिक प्रमाणात विक्री होणे गरजेचे आहे. तरच नव्या अंधांना केंद्रात सामावून घेणे, त्यांच्या हाताला पुरेसे काम व किमान मानधन देणे शक्य होणार आहे. कार्यकर्त्यांचे ऐक्य आणि समाजाचे पाठबळ यावरच हा प्रपंच उभा राहिला आहे. यापुढेही अंधांच्या 'स्वाभिमाना'ने जगण्याच्या लढाईला आपले बळ मिळेल, हा विश्वास आहे.
अवधूत पाटील
चळवळीतील एक कार्यकर्ता


