Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकारी, ठेकेदारांची भर पावसात कार्यतत्परता

महागाव- मासेवाडी रस्त्यावरील  'तो' जीवघेणा खड्डा मुजविला 


उपअभियंता राहुल माळी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील महागाव ते मासेवाडी रस्त्यावर पाच रस्त्यापासून तीनशे मीटर अंतरावर घळणाजवळ रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भर पावसात मुजविला. अधिकाऱ्यांच्या या कार्यतत्परतेचे महागाव परिसरातून कौतुक होत आहे.


महागाव : महागाव मासेवाडी रोडवरील घळणाजवळ रस्त्यावर असा मोठा खड्डा पडला होता. हाच खड्डा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुजविला आहे.


गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्गावरील महागाव ते तेरणी पुढे कर्नाटक राज्याला जोडणारा हा रस्ता आहे. या मार्गावरून अनेक नागरिक प्रवास करतात. बुगडीकट्टी, तेगिनहळ, मुंगुरवाडी, दुगुनवाडी, मासेवाडी येथून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी, नागरिक नोकरी, व्यवसाय, दवाखान्यासह अन्य कामासाठी महागावला येतात. तसेच या भागातील गडहिंग्लज,चंदगड,तळ कोकणात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. दिवसाकाठी या मार्गावरून दहा ते बारा एसटी बसच्या फेऱ्या होतात. या मार्गावर अनेक नागरिक दुचाकी, चार चाकी याशिवाय अनेक खाजगी वाहनांची वाहतूक होत असते.



सध्याच्या जोरदार पावसामुळे एका भागातील पाणी रस्त्याच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी संबंधित विभागाने सिमेंट पाईप टाकली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार लहान व बंद असल्याने पाणी रस्त्यावर थांबते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर निघाल्याने सदरची पाईप तुटल्याने रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे येथून वाहतूक करणे सर्वांनाच धोक्याचे होते. या खड्ड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याबाबत जोरदार चर्चा झाली होती.




दरम्यान, रविवार दिनांक २१ जुलै रोजी गडहिंग्लज येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता राहुल माळी यांना महागाव येथील नागरिकाने भ्रमणध्वनीवरून या खड्ड्याची माहिती दिली. माहिती मिळता क्षणी उप अभियंता श्री माळी यांनी शाखा अभियंता के. टी. कांबळे यांच्यासह महागाव येथे दाखल होत या खड्ड्याची पाहणी केली. खबरदारी म्हणून तसा फलक या खड्ड्याजवळ लावण्यात आला. रस्त्याखाली असणारे पाईप निसटल्याने सदर खड्डा पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेकेदार  विक्रमसिंह कुपेकर, राजू पोवार यांच्या मदतीने तातडीने दोन्ही बाजूच्या तुंबलेल्या गटारी जेसीबीच्या साह्याने स्वच्छ करण्यात आल्या. येथील सामाजिक कार्यकर्ते फिरोज सोलापुरे हे देखील दिवसभर या कामाच्या ठिकाणी दिवसभर उपस्थित राहत योगदान दिले. रस्त्यातील पाईपचीही दुरुस्ती करून सदर खड्डा मुजवण्यात आला. या अधिकाऱ्यांनी भर पावसात हे काम हाती घेऊन रस्ता वाहतुकीस निर्धोक केला.



 जि. प. बांधकामला 'मेन्टेनन्स' निधीच नाही, केवळ सामाजिक भावनेतून काम!



सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांना देखभाल दुरुस्ती निधीची तरतूद असते. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत रस्त्यांच्या देखभाल  दुरुस्तीसाठी मेन्टेनन्स निधीच नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. ऐनवेळी असे प्रसंग निर्माण झाल्यास स्थानिक ठेकेदारांना सामाजिक भावनेतून दुरुस्ती करून देण्याची विनंती केली जाते. महागाव-मासेवाडी रस्त्यावर पडलेला खड्डा देखील जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येतो. दुरुस्तीसाठी शासनाचा निधी नसताना देखील केवळ यामुळे कोणालाही दुखापत होऊ नये या भावनेतून अधिकाऱ्यांनी दखल घेत स्थानिक ठेकेदारांच्या मदतीने खड्डा मुजविला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.