छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर आता दोन फूट पाणी आले आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. यंदाच्या पावसात पुलावर दुसऱ्यांदा पाणी आले आहे. या पुलावरून होणारी गडहिंग्लज- चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
यंदा गडहिंग्लज तालुक्यात तब्बल दीड महिन्यानंतर आठवड्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम भागातील आजरा तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत अधून मधून वाढ होत होते. मात्र पुलावर पाणी आले नव्हते. गडहिंग्लज तालुक्यात आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. दोन दिवसापूर्वी पुलावर पाणी आले होते. मात्र दोन-तीन तासात पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली होती. सोमवारी सायंकाळी पासून जोरदार पावसाने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होत गेली. आज (मंगळवारी) सकाळी पुलाला समांतर पाणी होते. दुपारनंतर हळूहळू पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाले. दुपारी बाराच्या दरम्यान एक फूट पुलावर पाणी होते. आता सायंकाळी दोन फूट पाणी पुलावर आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली होती.
पोलीस प्रशासन, महसूल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी खबरदारी घेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. भडगावच्या तलाठी सौ. रूपाली कांबळे, पोलीस पाटील उदय पुजारी, आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, विजय बंदी, राहुल कारंडे आदी पुराच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत. सकाळपासून हे सर्वजण भडगाव पुलावर थांबून आहेत. वाहन चालकांना पर्यायी मार्ग बाबत यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.





