Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने पटकावले कांस्यपदक





नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. ऑलिम्पिक 2024 मधील भारताचे हे पहिले पदक आहे. शिवाय 2012 च्या लंडन ऑलिम्पिक नंतर प्रथमच भारताने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले पहिले पदकही आहे.




ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा बहुमानही या पदकामुळे मनुला मिळाला आहे. गेल्या 20 वर्षात ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या वैयक्तिक प्रकारात भारतीय महिला अंतिम फेरीत पोहोचली नव्हती. काल मनुने अंतिम फेरी गाठण्याची किमया करून दाखवली.


आतापर्यंतचे ऑलिम्पिकमधले यश 


राज्यवर्धन सिंह राठोड (2004 अथेन्स), अभिनव बिंद्रा (2008 बीजिंग), विजय कुमार (2012 लंडन) आणि गगन नारंग (2012 लंडन) यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनू भाकर ही पाचवी भारतीय नेमबाज ठरली.



पात्रता फेरीतील कामगिरी


पात्रता फेरीत 580 गुणांसह मनू भाकर तिसऱ्या स्थानावर राहिली. तिने सर्वाधिक परफेक्ट स्कोअर (27) नोंदवले. गेल्या 20 वर्षात वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. याआधी 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुमा शिरूर अंतिम फेरीत पोहोचली होती. कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिलांच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.



 मनू भाकरचे आतापर्यंतचे यश 

मनू भाकरने 2019 म्युनिक ISSF विश्वचषक स्पर्धेत चौथ्या स्थानासह ऑलिम्पिक पात्रतेवरही शिक्कामोर्तब केले.  तथापि, तिचे टोकियो ऑलिंपिक 2020 मधील पदार्पण अपेक्षेनुसार झाले नाही.  टोकियो 2020 नंतर लगेचच, लिमा इथे झालेल्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत, मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अजिंक्यवीर ठरली आणि 2022 च्या कैरो जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारामध्ये रौप्य, तर  2023 च्या हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच प्रकारात सुवर्णपदक जिंकले.  मनू भाकरचे प्रशिक्षण स्थळ हे डॉ.  कर्णी सिंग शूटिंग रेंज (नेमबाजी केंद्र), नवी दिल्ली हे असून तिचे जन्मस्थान झज्जर, हरयाणा आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.