समस्येकडे वसंत नाईक यांनी लक्ष वेधले अन तहसीलदारांनी तातडीने दिल्या सूचना
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके हे एक शांत, संयमी व अभ्यासू तहसीलदार म्हणून ओळखले जातात. संपूर्ण तालुक्याची जबाबदारी सांभाळत असताना जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक दाखले असोत किंवा जनतेची विविध कागदपत्रे व दाखल्यांची कामे असोत त्यांना वेळेत मिळण्याच्या दृष्टीने ते नेहमीच दक्ष असतात. असाच प्रत्यय काल भडगावमध्ये आला. पूरस्थितीमुळे ग्रामस्थांना स्वयंपाकाच्या गॅसची गैरसोय होऊ शकते हे ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी सांगताच त्यांनी काही सेकंदात गॅस एजन्सीला फोन करत तातडीने गॅस सिलिंडर उपलब्ध करण्याची सूचना दिली आणि आज सकाळी गावात उपलब्धता देखील झाली, त्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात आले.
भडगाव पुलावर हिरण्यकेशी नदीच्या पुराचे पाणी आल्याने हा मार्ग गेले सहा दिवस झाले बंद आहे. या पार्श्वभूमीवर काल उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार कृषिकेत शेळके यांनी भडगावला भेट देत येथील पूरस्थितीची पहाणी केली होती. यावेळी पूरस्थितीमुळे ग्रामस्थांना गॅस सिलिंडरची टंचाई भासू शकते याकडे ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी तिथूनच तातडीने गॅस एजन्सीला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत गावात तातडीने घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करावेत अशा सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज सकाळी गावात सिलिंडरची उपलब्धता करण्यात आली. वसंत नाईक यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन करत गॅस सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती दिली. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या कार्यतत्परतेमुळे व वसंत नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे भडगाव ग्रामस्थांची पूर परिस्थितीत देखील कोणतीही गैरसोय झाली नाही. यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.


