गडहिंग्लजला जनता दलाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील महापुराच्या समस्येकडे वेधले लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, निलजी, जरळी, भडगांव, इंचनाळ, ऐनापूर या बंधाऱ्यांची उंची वाढवावी, नदीपात्रातील विनाअट व ताबडतोब गाळ व वाळू काढून पात्र खुले करावे आदी मागण्या जनता दलाच्या वतीने प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन गडहिंग्लज तालुका जनता दलाचे अध्यक्ष बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. हे निवेदन प्रभारी निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती पाहता सरासरी ५० ते ६० हजार हेक्टरवरील दरवर्षी पिकांचे नुकसान होते. ऊस, भात, सोयाबिन, भाजीपाला पिकांचे प्रामुख्याने हानी होते. मात्र शासनाकडून मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवरील ऊस व ७ हेक्टरवरील भात, सोयाबीन ४ हजार हेक्टर, १५०० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करुन विना अट नुकसान भरपाई देणेत यावी.
गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यामधून हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी अशा नदया वाहतात. त्याच्यावर अवलंबून असणारे छोटे मोठे पाटबंधारे तलाव या पावसाने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. मागील पाच वर्षात तीन वेळा महापुराचा दणका बसलेला आहे. सन २०१९, २०२१ व आता २०२४ मध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आल्यामुळे नद्यांच्या पात्राच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान व दोन्ही बाजूच्या कडेला असणाऱ्या गावांचे नुकसान झालेले आहे. शासन महापूर आला की, तेवढयाच महिन्यामध्ये शेतकऱ्यांना व ग्रामस्थाना तोंडाला पाने पुसण्याचे कामे करत आहे. त्याच दरम्यान लोकप्रतिनिधी सुद्धा एखाद्या पर्यटनाला गेल्याप्रमाणे फोटो, व्हिडीओ काढणे याचा फार्स करत असतात. त्यानंतर वर्षभर या विषयाकडे कोणीही फिरकुन पहात नाहीत ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे.
सद्या हिरण्यकेशी, ताम्रपर्णी आणि घटप्रभा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्या नद्यांचा पुढे कर्नाटकच्या हद्दीमध्ये त्यांचा संगम होतो. कर्नाटकमध्ये असणाऱ्या हिडकल डॅममुळे गडहिंग्लज तालुक्यातील निलजी या बंधाऱ्यापर्यंत त्याचे बॅक वॉटर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी धिम्या गतीने कमी होत आहे. त्याचाही विचार व्हावा. तसेच नदीच्या पात्राच्या दोन्हीही कडेला ऊस, भात व इतर पिके आठ दिवस पाण्यात असल्याने पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. त्याचा पंचनामा ताबडतोब होऊन जास्ती जास्त शेतकऱ्यांना मिळावी.
तसेच प्रत्येक वर्षी या नदयांना महापूर येत आहे. त्याची कारणमिमांसा तपासली असता या नदीची खोली गाळ आणि वाळूने भरल्याने कमी झालेली आहे. त्यामुळे दोन, तीन दिवसामध्ये पाऊस पडला तरीसुद्धा महापुराचा फटका त्या गावांना बसत आहे. तातडीने या नदीतील गाळ आणि वाळू काढून पात्र खुले करावे. तसेच निलजी, जरळी, भडगांव, इंचनाळ, ऐनापूर आदी गावा-गावाला जोडणारे छोट्या-मोठ्या पुलांची उंची तातडीने वाढवावी असे तीन्ही तालुक्यातील जनतेची मागणी आहे. या सर्व समस्यांची सोडवणूक तातडीने करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
यावेळी जनता दलाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बाळेश नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंटी कोरी, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, कार्याध्यक्ष उदय कदम, बाजार समितीचे उपसभापती रामा पाटील, सागर पाटील, गुरुनाथ मोरे, रमेश पाटील, बाळकृष्ण परीट, श्रीरंग चौगुले, रमेश मगदूम, भीमराव पाटील, दता मगदुम, शशिकांत चोथे, हुनगिनहाळ सरपंच दयानंद गुंडली, काशिनाथ बेळगुद्री, शिवाजी देसाई, माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर यांच्यासह जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



