शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांचे प्रतिपादन
सहसंपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल रियाजभाई शमनजी यांचा गडहिंग्लजला सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): रियाजभाई शमनजी यांची शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुखपदी निवड झाल्याने याचा फायदा निश्चितच पक्ष संघटना वाढीसाठी होईल. असे प्रतिपादन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले.
चंदगड, गडहिंग्लज, कागल विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल रियाजभाई शमनजी यांचा गडहिंग्लज येथील शिवसेनेच्या जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख शमनजी यांचा सत्कार जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे पुढे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात दि. ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत भगवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून 'गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक' ही मोहीम राबवून गावागावात जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून शिवसैनिकांनी पक्षाला बळकटी द्यावी. सर्व नव्या-जुन्या शिवसैनिकांनी एकसंघपणे पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
सहसंपर्कप्रमुख रियाजभाई शमनजी म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील कार्यकर्त्याला जबाबदारी देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो विश्वास दाखविला आहे तो मी सार्थ ठरवेन. गडहिंग्लज, चंदगड, कागल विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेन. येत्या विधानसभा निवडणुकीत या तीनही मतदार संघात शिवसेनेचेच आमदार व्हावेत अशी प्रतिज्ञा करून सर्वांनी कामाला लागूया असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, तालुकाप्रमुख अजित खोत, युवराज पवार, जयसिंग टिकले, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास तालुकाप्रमुख शिवगोंड पाटील, लक्ष्मण मनवाडकर, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, उदय मंडलिक, सुरेश हेबाळे, संदीप चव्हाण, संदीप कुराडे, संकेत रावण, प्रकाश रावळ, राजकुमार भोगण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आभार कागल तालुका संघटक मारुती पुरीबुवा यांनी मानले.

