छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
जरळी बंधाऱ्यावरही पाणी येण्यास सुरू
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर आज पहाटेपासून पाणी येण्यास सुरू झाले आहे. गेले दोन दिवस जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. शुक्रवारी दुपारी पुलाखाली दीड फूट अंतरावर पाणी होते. आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली असून अद्याप वाहतूक मात्र सुरू आहे.
भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, तलाठी सौ. रूपाली कांबळे, ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक पुराच्या पाण्यावर लक्ष ठेवून असून भडगाव पुलावर जाऊन वाहन चालकांना खबरदारी घेत वाहने चालविण्याचे आवाहन केले आहे. भडगाव येथील आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झाले आहे. पाण्याची तीव्रता कमी असल्याने अजून पुलावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
नगरपालिकेचे पुरासंदर्भातील दोन फलक एकाच जागी पडून
दरम्यान, पुराच्या पाण्यासंदर्भात नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करणारे गडहिंग्लज नगरपालिकेने भडगाव पुलाजवळ मोठे दोन फलक लावले आहेत. मात्र हे फलक झाडाझुडपाजवळ लावले गेल्याने वाहन चालकांचे या फलकाकडे लक्ष जात नाही. विशेष म्हणजे दोन्हीही फलक एकाच ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना फलक दिसेल अशा ठिकाणी लावणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फलक ठळकपणे दिसेल अशा जागेची निवड पालिकेने करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होत आहे.
जरळी बंधार्यावरही पाणी येण्यास सुरू
हिरण्यकेशी नदीवरील निलजी बंधारा कालच पाण्याखाली गेला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने जरळी बंधार्यावरही पाणी येण्यास सुरू झाले आहे.
भडगाव पुलाचे व्हिडिओ येथे पहा 👇👇





