भडगाव - जरळी मार्गावरील घटना
रस्त्यावर पडलेले बाभळीचे झाड स्थानिक यंत्रणेने युद्धपातळीवर केले बाजूला
वाहनधारक व नागरिकांनी केले यंत्रणेचे कौतुक
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भडगाव - जरळी मार्गावर कोसळलेले झाड गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या कार्यतत्परतेमुळे युद्धपातळीवर तातडीने हटवत स्थानिक यंत्रणेने रस्ता वाहतुकीस खुला केला.
याबाबतचे अधिक माहिती अशी की, आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गटविकास अधिकारी शरद मगर यांना गडहिंग्लजकडे आपल्या वाहनातून येताना भडगाव-जरळी मार्गावर रामा कांबळे यांच्या घराजवळ काकासाहेब तराळ यांच्या शेतातील बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळल्याचे दिसले. रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक थांबली होती. गटविकास अधिकारी श्री. मगर यांनी तातडीने भडगावचे ग्रामसेवक राजेंद्र गवळी यांना याची माहिती दिली व सदर झाड तातडीने रस्त्यावरून हटविण्याच्या सूचना दिल्या. पोलीस पाटील उदय पुजारी यांनाही माहिती मिळताच त्यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक श्री. गवळी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, रवींद्र शेंडुरे, दयानंद पट्टणकुडी, जमीर हवालदार, सद्दाम शेख, बाळासो कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या साह्याने झाड रस्त्यावरून बाजूला हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला. झाड हटवल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी रस्त्याची साफसफाई केली. गटविकास अधिकारी शरद मगर यांची कार्यतत्परता व भडगाव येथील स्थानिक यंत्रणेने तातडीने केलेली कार्यवाही निश्चितच कौतुकास्पद आहे.




