Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावरील पुराच्या पाण्याची पातळी वाढू लागली ; वाहतूक ठप्पच

जरळी, निलजी, ऐनापूर, नांगनूर, इंचनाळ बंधारेही पाण्याखाली 


हिरण्यकेशी नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत 


                                        भडगाव पूल 
                 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): गेले आठवडाभर गडहिंग्लज तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. हिरण्यकेशी नदीला पूर आल्याने गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गाला जोडणारा भडगाव पूल पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक गेले दोन दिवस झाले ठप्प झाले असून जरळी, निलजी, नांगनूर, ऐनापूर, इंचनाळ हे बंधारे देखील पाण्याखाली आहेत. यामुळे तालुक्यातील जनजीवनच विस्कळीत बनले आहे. भडगाव पुलावरील पुराच्या पाणी पातळीत सायंकाळ पासून वाढ होत आहे.


                          निलजी बंधारा 

गडहिंग्लज तालुक्यात गेल्या दीड महिना झाले पावसाला जोर नव्हता. जेमतेम पिकांना जगवण्याइतपतच पाऊस सुरू होता. मात्र गेले आठवडाभर झाले तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम घाटातील मुसळधार पाऊस व गडहिंग्लज तालुक्यात सुरू असणारा संततधार पाऊस यामुळे गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. भडगाव पुलावर पुराचे पाणी आल्याने मंगळवारी दुपारपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा या पुलावर पाणी आले असून सायंकाळपासून पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने  वाढत आहे. त्यामुळे गडहिंग्लज - चंदगड मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.


                           नांगनूर बंधारा 

गडहिंग्लज तालुक्यातील जरळी, निलजी, नांगनूर, ऐनापुर, इंचनाळ हे बंधारे देखील पाण्याखाली गेल्याने हे मार्गदेखील वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. पूरस्थितीमुळे चंदगडसह तालुक्याच्या पूर्व भागाचा संपर्कच पूर्णतः तुटला आहे. वाहतूकच बंद झाल्याने शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे.


                            ऐनापुर बंधारा 

संततधार पावसामुळे तालुक्यातील नरेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून तेरणी, येणेचवंडी, वैरागवाडी, शेंद्री या धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे. जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी घर व जनावरांच्या गोठ्यांच्या भिंती कोसळल्या आहेत. तालुक्यात अशा २५ हुन अधिक पडझडीच्या घटना घडल्या आहेत. महसूल विभागाकडून पडझडीचे पंचनामे सुरू आहेत.



                   हरळी- इंचनाळ मार्गावरील बंधारा 


शासकीय यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापनची टीम सज्ज


भडगाव पुलावरील पुराच्या पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, तलाठी सौ. रूपाली कांबळे, ग्रामसेवक राजेंद्र गवळी, कोतवाल किरण कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय बंदी पुलावर सज्ज आहेत. दरम्यान, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले  यांनी भडगाव पुलावरील पूरस्थितीची पाहणी केली. सर्व परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली. खबरदारी म्हणून पुलावरून कोणालाही सोडण्यात येऊ नये अशी सूचना त्यांनी दिल्या. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणादेखील सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.



बंधारे पाण्याखाली, पूर्व भागाचा गडहिंग्लजशी संपर्क तुटला




भडगाव पुलासह जरळी, निलजी, नांगनूर या बंधार्‍यांवरदेखील पाणी आल्याने पूर्व भागाचा गडहिंग्लजशी असणारा संपर्कच तुटला आहे. वाहतूकच ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत बनले आहे.नांगनूर-संकेश्वर दरम्यान हिरण्यकेशी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून एक फुटापेक्षा अधिक उंचीने पाणी वाहत असल्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही बंदच राहिली. कर्नाटक पोलिसांनी या मार्गावरून जाण्यास नागरिकांना मज्जाव केला आहे .बुधवारी सकाळपासून या परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पश्चिम भागातील प्रकल्पातील होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढच होत आहे. संकेश्वर ही या विभागातील प्रमुख बाजारपेठ आहे. महाराष्ट्राच्या सीमा भागातील नागरिकांना  बँक  काम, शिक्षण ,दवाखाना, बाजार ,व्यवसाय यासाठी संकेश्वरला चिकालगुड्ड या पर्यायी मार्गाने जा ये करावी लागत आहे. नांगनूर  संकेश्वरला जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा कमी उंचीचा  बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. नवीन बंधाऱ्यावरून सलग दोन दिवस वाहतूक बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे नांगनूर, खणदाळ, बसर्गे, अरळगु़ंडी, कडलगे या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.