मग सांगा दोन शिक्षक आठ वर्गांना कसे शिकविणार?
नौकुड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चित्र
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील ऐतिहासिक निसर्गरम्य किल्ले सामानगडाच्या पायथ्याशी बसलेल्या नौकुड (ता. गडहिंग्लज) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एकूण आठ वर्ग आणि तीन शिक्षक अशी अवस्था निर्माण झाली असून अपुऱ्या शिक्षक संख्येअभावी कोण शिक्षक देता का शिक्षक? अशी म्हणण्याची वेळ गावातील पालक वर्गांवर आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे निवेदनाद्वारे याकडे लक्ष वेधल्याचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी सांगितले.
नौकुड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहेत. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून आठ वर्ग आणि तीन शिक्षक अशी अवस्था आहे. त्यामुळे हलकर्णी पूर्व भागातील अत्यंत दुगर्म भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौकुड गावातील मुलांनी शाळा शिकायची कि, नाही? हा प्रश्न पडला आहे. डोंगरी भाग असल्यामुळे शेतात काही पिकत नाही आणि पिकलेच तर जंगली प्राणी ती पिके ठेवत नाहीत. या जंगली प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत देखील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष झाले आहे.
गावातील शिक्षणाची ही अवस्था असल्याने येथील ५० ते ६० टक्के वर्ग हा मुंबई, पुणे या ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थी कमी आहेत. नौकुड गाव हे तालुक्यापासून १५ कि.मी अंतरावर आहे. डोंगरी भागातील गाव असल्याने मुलांना शाळेसाठी तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा पाठवणे पालकांना शक्य नाही. यापूर्वी दोन शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. आता फक्त शाळेत तीन शिक्षक आहेत. पहिली ते आठवी असे आठ वर्ग आणि तीन शिक्षक. यातील एक शिक्षक शासनाने त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तालुक्यात जातात मग शाळेत दोन शिक्षक असतात. मग एकूण आठ वर्गांना दोन शिक्षक कसे शिकविणार? याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. पुरेसे शिक्षक न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

