माजी सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव माने यांचा सल्ला
महागावच्या महात्मा फुले विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थी हे भविष्यातील भारताचे सुजाण नागरिक आहेत. त्यांच्यावर योग्य संस्कार आई-वडिलाप्रमाणे शाळेत शिक्षकाकडून होत असतात. पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांना चांगली पुस्तके वाचनाची सवय लावावी. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेचा नवलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असा सल्ला माजी सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव माने यांनी दिला.
महागाव येथील राधिका हॉलमध्ये महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी आण्णासाहेब पाटील होते. यावेळी माजी मुख्याध्यापक एन.आर.फडके, सुळेच्या सरपंच शिल्पा डोंगरे, महागावचे माजी सरपंच मुरलीधर पाटील, महादेव कांबळे,आनंदा सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक मोहन कांबळे यांनी केले. यावेळी दहावी व बारावी बोर्ड परीक्षा, आठवी शिष्यवृत्ती,आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती, कला , क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.शिवाजीराव होडगे,आनंदा सूर्यवंशी, संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी तर आभार प्रा. भिमराव मनगुत्ते यांनी मानले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी, दिपक डोंगरे, एल. ए. जांबुटकर, भिमराव भुईंबर, पापालाल पठाण, एस. ए. पठाण,नानासाहेब कोकितकर,संजय तेली यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.




