छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आज दिवसभर जोराचा पाऊस नसल्याने हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजता भडगाव पुलावर आलेले नदीचे संपूर्ण पाणी ओसरले आहे. आता गडहिंग्लज -चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे.
भडगाव नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य वसंत नाईक, पोलिस पाटील उदय पुजारी, तलाठी सौ रूपाली कांबळे व इतर समिती सदस्य पुराच्या पाण्यावर व वाहतूक सेवावर दिवसभर लक्ष ठेवून होते. पहाटे साडेपाच वाजता पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने सकाळी दहा नंतर दुपारपर्यंत वाहतूक काही तास बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर पाणी ओसरू लागल्याने हळूहळू वाहतूक सुरू करण्यात आली होती. सायंकाळी पुलावरील पाणी पूर्णता ओसरल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन टीमचे दिवसभर परिश्रम
आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य वसंत नाईक, पोलीस पाटील उदय पुजारी पुराच्या पाण्यावर कालपासूनच लक्ष ठेवून होते. आज पहाटे पुलावर पाणी येण्यास सुरू झाल्याने तेव्हापासूनच या ठिकाणी सज्ज राहत दक्षता घेतली होती. बॅरिकेट्स लावणे, वाहन चालकांना मार्गदर्शन करणे, पाण्याच्या परिस्थिती बाबत प्रशासनाला वेळोवेळी माहिती देणे व सूचनांचे पालन करणे आदी बाबी दिवसभर पार पडत परिश्रम घेतले. पुलावरील वाहतुकीबाबत माहिती घेण्यासाठी या टीमला दिवसभर नागरिकांचे फोन येत होते. फोन केलेल्या प्रत्येक नागरिकांचा फोन उचलत त्यांनी पुलावरील वाहतुकीबाबत नागरिकांना माहिती देताना दिसत होते.





