ठाकरे शिवसेना पक्षाने वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष
तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज- बहिरेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या वडरगे डोंगरातील नाल्यात टाकलेला कचरा वडरगे गाव तलावात मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे. त्यामुळे या नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
गडहिंग्लज- बहिरेवाडी राज्यमार्गालगत वडरगे वन विभाग हद्दीतील जंगलात बांधलेल्या नाल्यामध्ये पोल्ट्रीच्या दगावलेल्या कोंबड्या, दवाखान्यातील टाकाऊ कचरा व इतर वस्तू टाकल्या जातात. सदर कचरा हा पावसाच्या पाण्याने वाहत येऊन वडरगे गाव तलावात मिसळत आहे. परिणामी पाणी दूषित होत असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तलावामध्ये जनावरे तसेच कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांना याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलातील या नाल्याला संरक्षक जाळी किंवा भिंत बांधण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजित खोत, संभाजी आडावकर, रविंद्र मोरे, संतोष आडावकर, संभाजी हजारे, अंकुश चौगुले, उत्तम गोरूले, सुरज गोरूले, राजेंद्र देवार्डे उपस्थित होते.

