सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
खड्डा मुजविण्यासाठी साहित्य दाखल, मात्र पाणी असल्याने काम करणे अशक्य
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव पुलाजवळ भडगाव गावच्या दिशेने रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. पुलावर व नजीकच्या रस्त्यावर अद्याप काही प्रमाणात पुराचे पाणी असल्याने हा खड्डा मुजविता येणे अशक्य आहे. त्यामुळे हा मुजवल्याशिवाय वाहतूक सुरू न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुलाच्या दोन्ही बाजूनी नागरिकांना पायी जाण्या-येण्यासाठी सोडले जात आहे. अशी माहिती पोलीस पाटील उदय पुजारी यांनी दिली.
हिरण्यकेशी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे सातव्या दिवशी देखील भडगाव पुलावरील वाहतूक बंदच आहे. रविवारपासून पाऊस थांबल्याने पुराच्या पाण्याची पातळी ओसरत आहे. पुलावर आता केवळ अर्धा फूट पाणी आहे. आज सायंकाळी पुलावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता होती मात्र पुलाजवळ भडगावच्या दिशेने रस्त्यावर पुराच्या पाण्याने मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे आज वाहतूक सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. यापूर्वी येथे लहान खड्डा पडला होता त्याचे पॅचवर्क करण्यात आले होते. पुराचे पाणी थांबल्याने सदर पॅचवर्क निघून या ठिकाणी खड्डा पडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. गिरी व श्री. मटकर तसेच पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी पाहणी केली.
रस्त्यावर पाणी असल्याने दुरुस्तीला अडचणी
सदर खड्डा अजून पाण्यात असल्याने दुरुस्ती करता येणे अशक्य आहे. रस्त्यावरील पाणी ओसरल्याशिवाय पॅचवर्क करता येणार नाही. दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने साहित्य देखील उपलब्ध केले आहे. मात्र त्यांना पाणी उतरण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आज सुरू होणारी वाहतूक या खड्ड्यामुळे खबरदारी म्हणून बंदच ठेवण्यात आली आहे. पोलीस पाटील उदय पुजारी, वसंत नाईक यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी पायी येणाऱ्या जाणाऱ्यांना सोडण्यासाठी खबरदारी घेत ते मदत करत आहेत.


