प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत शासनाचे वेधले लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत ही चिंतनीय बाब असून यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी गडहिंग्लज येथील महिलांच्या विविध संघटनांनी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्र राज्यातही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी राज्यात ४७३८१ गुन्हे महिलांसंबंधी घडले असून ते मागील वर्षापेक्षा अधिक आहेत हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर २०२३ मध्ये बलात्काराचे ७५०० गुन्हे दाखल झाले. तसेच अपहरण, मारहाण, खून असे गुन्हे खुपच वाढले आहेत. राज्यात सरासरी दररोज १२१ महिलांसंबंधी तर ५५ लहान मुलांसंबंधीत गुन्हे नोंद होतात. एकाबाजूला राज्यातील शाळांची संख्या घटत आहे, पटनोंदणी कमी होत आहे. तर दाखल मुलांच्या गळतीचे प्रमाण देखील वाढत असून बालकांच्या बाबतीतील गुन्हे देखील वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. अलिकडेच राज्यातील रायगड जिल्ह्यातील उरण येथे यशश्री शिंदे या महिलेची हत्या झाली आहे. कल्याण येथील अक्षता म्हात्रे हिचा मंदिरातील पुजाऱ्यांनी सामूहिक अत्याचार करुन खुन केल्याची घटना घडली आहे. तर पालघर वसई येथील आरती यादव हिचा खुन झाला आहे. या वाढत्या गुन्ह्यांच्या घटना राज्यातील महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे दर्शविते. यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात व महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील महिलांनी दिला आहे.
निवेदनावर अरुणा शिंदे, उज्वला दळवी, उर्मिला कदम, शारदा अजळकर, सुमन सावंत, सुवर्णलता गोईलकर, गीता पाटील, छाया वडगावे, सविता चव्हाण, गीता पालकर, शशिकला पाटील, सुरेखा पाटील, सुमन पाटील, अश्विनी पाटील, उषा पाटील, शोभा पाटील, सुशीला पाटील यांच्यासह इतर महिलांच्या सह्या आहेत.


