गडहिंग्लज : तेरणी येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर दुंडाप्पा मलकानावर यांचे काल रात्री गुजरात येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज तेरणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
गंगाधर मलकानावर यांची समाजसेवक, पत्रकार व गावातील पंच म्हणून एक वेगळी ओळख होती. दैनिक लोकमतमध्ये त्यांनी बरीच वर्षे ग्रामीण वार्ताहर म्हणून काम पाहिले होते. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी तेरणी पंचक्रोशीतील विविध समस्या व प्रश्नांवर लिखाण करत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांचे चिरंजीव नोकरीनिमित्त गुजरात येथे वास्तव्यास आहेत. त्यांना भेटण्यासाठी ते गुजरातला गेले होते. काल रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. तेरणी गावातील एक निस्वार्थी व मनमिळावू व्यक्तिमत्व हरपल्याने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे.

