Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीकर चाकरमान्यांना मुंबईत हक्काचा निवारा मिळवून दिलेले व्यक्तिमत्व हरपले!

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबुराव अत्याळे यांचे निधन 


तेरणी येथे आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार





गडहिंग्लज : मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व तेरणी ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव रामा अत्याळे यांचे बेळगाव येथे आज पहाटे निधन झाले. तेरणीकर चाकरमान्यांना मुंबईत राहण्यासाठी हक्काचा निवारा मिळवून देणारे व 1980 च्या काळात मुंबई पोलीस दलात पहिले पीएसआय म्हणून रुजू होत तेरणी गावचे नावलौकिक करणारे व्यक्तिमत्व हरपल्याने तेरणी गावावर शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी तेरणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 




18 मे 1963 रोजी बाबुराव अत्याळे हे मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले. त्यांनी मिळालेल्या या संधीचे सोने केले. त्यानंतर 1976 मध्ये त्यांना हेड कॉन्स्टेबल म्हणून बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली. या पदासाठी त्यांनी अर्ज केला परंतु त्या काळात इंग्रजी विषय घेऊन अकरावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेला असण्याची अट होती, त्यामुळे त्यांचा अर्ज खात्याने निकालात काढला. 1977 मध्ये पुन्हा त्यानी उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज केला होता मात्र त्यावेळी देखील त्यांना यश आले नाही, पुन्हा पदरी निराशा आली. मात्र खचून न जाता त्यांनी जिद्द सोडली नाही. यासाठी आपण कोणाचे तरी मार्गदर्शन घेतले पाहिजे व याच्यावर पर्याय शोधला पाहिजे असे विचार करून त्यांनी आपले नातेवाईक व तेरणी गावातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय  परशराम मनवाडे यांच्या कानावर ही गोष्ट त्यांनी घातली. परशराम मनवाडे यांना ही बाब समजताच त्यांनी त्यांचे राजकारणातील मित्र व तत्कालीन आमदार स्वर्गीय ॲड. श्रीपतराव शिंदे यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी तातडीने महाराष्ट्र सरकारचे तत्कालीन गृहमंत्री भाई  वैद्य यांना सांगून पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणासाठी बाबुराव अत्याळे यांची शिफारस करण्याची विनंती केली. त्यामुळे पीएसआयच्या प्रशिक्षणासाठी नाशिक येथे त्यांना पाठविण्यात आले.



18 मार्च 1980 रोजी  ते मुंबई पोलीस दलात पीएसआय म्हणून रुजू झाले. त्यावेळी  तेरणी गावचे ते पहिले पीएसआय होते. मुंबई येथे त्यांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये अकरा वर्षे पीएसआय पदावर उत्कृष्टरित्या सेवा बजावली. 1991 मध्ये त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली. या पदावर त्यांनी पाच वर्षे सेवा बजावल्यानंतर 1996 साली त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली. या पदावर त्यांनी विविध पोलीस ठाण्यात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला. 31 मे 2000 रोजी मुंबई पोलीस दलातून ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा पोलीस दलातील प्रवास हा आजच्या पिढीला प्रेरणा देणार आहे.



तेरणी ग्रामस्थांसाठी मुंबईत विकत घेतली पहिली खोली 


पोलीस दलात रुजू झाल्यानंतर बाबुराव अत्याळे यांनी नऊ वर्षानंतर तेरणी गावातून मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांची तेथे राहण्याची कायमस्वरूपाची सोय व्हावी यासाठी पटेल बिल्डिंगमध्ये 15 क्रमांकाची खोली विकत घेतली. त्यामुळे तेरणी गावातील रहिवाशांना त्यांच्यामुळे मुंबई या ठिकाणी एक हक्काची खोली मिळाली. त्यानंतर पुढे काही वर्षांनी तेरणी ग्रामस्थ मंडळ मुंबई या नोंदणीकृत मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून बाबुराव अत्याळे यांनी धुरा सांभाळली आज तेरणी गावातून मुंबईत नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या गोरगरीब, होतकरू नागरिकांना त्यांच्यामुळे कायमस्वरूपी राहण्याची सोय झाली आहे.


खडतर परिस्थितीतून मात करत पोलीस दलातील बजावलेली सेवा व त्यातूनही तेरणी गावच्या लोकांसाठी काहीतरी करण्याची मनात असलेली तळमळ, फुटपाथवर झोपून तेरणीकरांसाठी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरविणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा 15 मे 2022 रोजी 81 वा वाढदिवस तेरणी गावात तेरणी ग्रामस्थ मंडळातर्फे मोठ्याने साजरा केला होता. जनता दलाचे नेते व माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई, मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.



त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती नींगुबाई, मुलगा विक्रांत, महेश, मुलगी मनीषा, निलगंगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.