गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बदलापूर (जिल्हा ठाणे ) येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या दिनांक २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुका महाविकास आघाडीकडून उद्या गडहिंग्लज बंदची हाक दिली आहे. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लेकी, बाळीच्या सुरक्षेसाठी बदलापूर घटनेनं महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली आहे. आंदोलन करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद' महाविकास आघाडीने जाहीर केला आहे. हा बंद राजकीय नसून विकृतीचा निषेध आणि बंदोबस्त करण्यासाठी आहे. सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे व महाराष्ट्र बंद यशस्वी करावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आले.
यावेळी ठाकरे पक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, तालुकाप्रमुख दिलीपराव माने, अजित खोत, शहर प्रमुख संतोष चिकोडे, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य वीरसिंग बिलावर, सरचिटणीस उत्तम देसाई, रवींद्र पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह चव्हाण, जनता दलाचे नितीन देसाई, रमेश मगदूम, सागर पाटील यांच्यासह विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

