खासदार धैर्यशील माने यांची समाज बांधवांना ग्वाही
महागाव येथे हणबर गवळी समाजाचा मेळावा संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हणबर गवळी समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विधानसभेत समाजाचा प्रतिनिधी आमदार म्हणून गेला पाहिजे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघातून समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा. असे सांगून हणबर गवळी समाजाच्या पाठीमागे आपण हिमालयासारखे उभे राहू, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
महागाव (ता. गडहिंग्लज) येथे गवळी समाजाचा मेळावा, सत्कार समारंभ व गुणगौरव सोहळा पार पडला. खासदार माने बोलत होते. यावेळी समाजाचे नेते बाळासाहेब कलागते, समाजरत्न डॉ. गंगाधर व्हसकोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, उजाळवाडी येथे हणबर गवळी समाजाच्या जागेत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याठिकाणी मुले व मुलींसाठी वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बाळासाहेब कलागते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच बैठक घेऊन चंदगड विधानसभेची उमेदवारी जाहीर करू. त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी समाजाची असेल.
डॉ. गंगाधर व्हसकोटी म्हणाले, हणबर गवळी समाज एकजूट होणे गरजेचे आहे. समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आतापर्यंत कोणतेही सत्ता नसताना आम्ही अनेक ठिकाणी बोरवेल, शेतकऱ्यांचे कर्ज आरोग्य शिबीर, मोफत रुग्णसेवा. अशी सेवा दिली आहे आणि अविरतपणे देत आहोत. समाज बांधवांवरील अन्याय विरोधात वेळोवेळी आवाज उठविला आहे. समाजातील एकाही बांधवावर जरी अन्याय झाला तरी सर्व समाज बांधवांनी एकजूटपणे पाठीशी राहणे आवश्यक आहे. 8 जून रोजी सकाळी माझ्यावर अज्ञातांकडून हल्ला झाला. त्यावेळी समाजाने एकत्र येऊन उठावा करण्याची गरज होती. एकमेकातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने अशा प्रसंगांवर लढा देण्याची गरज आहे याकडे देखील डॉ. व्हसकोटी यांनी लक्ष वेधले.
देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे झाली तरी देखील हणबर समाजाला शिक्षण, नोकरीत न्याय मिळालेला नाही. समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा जातीचा दाखला मिळण्यात अडचणी येत आहेत. इतर समाजाप्रमाणे हणबर गवळी समाजासाठी देखील स्वतंत्र महामंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. समाजातील मुला-मुलींना शासकीय वस्तीगृहांमध्ये राहण्यासाठी सोय झाली पाहिजे, कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या समाज बांधवांना जातीची अट शिथिल केली पाहिजे, जातीच्या दाखल्यासाठी साठ वर्षांपूर्वीची जन्म नोंद दाखल्याची अट शिथिल करण्यात यावी, ग्रामसेवक पोलीस पाटील, सरपंच यांच्या चौकशीनुसार दाखला देण्यात यावा, हणबर गवळी समाजातील मुला मुलींना बस प्रवास मोफत मिळावा, गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागात हलकर्णी गेले पंधरा वर्षे पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व शेती पाण्याचा प्रश्न शासनाने कायमस्वरूपी सोडवावा, आदी प्रश्नांकडे डॉ. व्हसकोटी यांनी खासदार धैर्यशील माने यांचे लक्ष वेधले.
यावेळी हणबर गवळी समाजातील निवृत्ती मधुकर खोत, सोनाली सटूप्पा नूलकर, सुहास संजय खोत, सौ शोभा भरत पाटील, भरत बाळगोंडा पाटील यांच्यासह राजाराम खोत, सोमेश गुंडाप्पा व्हसकोटी, स्वाती सुरेश घटगयांवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुसिद्धेश्वर स्वामीजी मजलटी यांचे आशीर्वाचन पार पडले.
यावेळी तात्यासाहेब हांडे, हणबर गवळी उन्नती संस्थेचे राज्य अध्यक्ष शामराव खोत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मारुती नवलाई, सांगली जिल्हा अध्यक्ष अजित कोणी तालुकाध्यक्ष सर्जेराव मटकर, राधानगरी तालुका अध्यक्ष सागर बुरले यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संयम हुक्केरी यांनी केले.









