संजनाच्या अपघाती मृत्यूने नागरिक हळहळले
जखमी वडिलांवर उपचार सुरु
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बेरडवाडी येथील खडीमशीन नजीकच्या चढावाच्या वळणावर अचानक एसटी बस मागे सरकल्याने पाठीमागून येत असलेल्या दुचाकीला धडकून झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुचाकीवर असलेले तिचे वडील जखमी झाले आहेत. संजना आनंद हुदली (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज ) असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, संजना ही हसुरवाडीनजीक एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यामुळे सकाळी महाविद्यालयाला येण्यासाठी ती व तिचे वडील आनंद हे दोघेही आपल्या दुचाकीवरून निघाले होते. संजना दुचाकी चालवत होती व वडील मागे बसले होते.
दरम्यान, बेरडवाडी येथील खडीमशीन पासून काही अंतरावर असणाऱ्या लँडमार्क व्हॅली कमानी जवळ संत गजानन महाराज कॉलेजकडे जाणाऱ्या वळणावर एसटी बस त्यांच्या पुढे होती आणि ते मागे होते. अचानक एसटी बस मागे सरकत आली व त्यांच्या दुचाकीला धडकली. या धडकेत गाडी चालवत असलेल्या संजनाचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. जखमी वडील आनंद हे संजना शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातच सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. अपघातानंतर संजनाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून सर्वांचीच मने हेलावली.
एसटीचा ब्रेक फेल की ताबा सुटला?
चढाव संपताच वळणावर सदर एसटी बस आल्यानंतर अचानक मागे कसे सरकली. एसटीचा ब्रेक फेल झाला की ताबा सुटला? की अन्य काही बिघाड निर्माण झाला याबाबत विविध तर्क वितर्क सुरू आहेत. अजून नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र या अपघातामुळे एका निष्पाप विद्यार्थिनीचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.








