प्रा. किसनराव कुराडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद स्वामी यांच्या हस्ते देण्यात शाळेला एक रोप व पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी शेतकरी अण्णापा मुसळे, शिवराज महाविद्यालयाचे प्रा. विक्रम शिंदे, एस. बी. प्रियद्रशी, एस. एस. खडकेकर उपस्थित होते.
गडहिंग्लज उपविभागातील शिक्षण सहकार, साहित्य, समाजकारण, क्रीडा क्षेत्रातील तज्ञ प्रा. किसनराव कुराडे यांचे ८१ वे जन्मवर्ष आहे. ऐनापूर या एका छोट्याशा खेडेगावातून अत्यल्प भुधारक कुटूंबात जन्म घेऊन स्वतःच्या कर्तुत्वाने व हिमतीने परिस्थितीवर मात करुन स्वतःला सिद्ध करत शून्यातून विश्व निर्माण करणारे संवेदनशील व उपक्रमशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.
अवघड परिस्थितीतून शिक्षण घेत असताना आई-वडिलांच्या पाठिंब्याने व संस्काराने सवंगडी गोळा करून शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. कमवा व शिका या योजनेचे शिल्पकार म्हणून सरांना नावाजले गेले. प्राध्यापक म्हणून काम करीत असतांना, स्वतःच्या पुढाकाराने ' शिवराज विद्या संकुल 'सारखी शिक्षण संस्था उभी केली. परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून सहकार महर्षी दत्ताजीराव कदम सूतगिरणी सुरू केली. तालुक्यातील पहिली शिक्षण सेवकांची पतसंस्था सुरू करून अनेकांच्या संसारात हातभार लावला. यशवंत बझार ही काळाच्या पुढची संकल्पना राबविली. शिवाजी बँक, भारतीय आरोग्यधाम, सावित्रीबाई फुले औद्योगिक संस्था, अनेक दूध संस्था, संस्था, सेवा संस्था, विश्वकर्मा सुतार लोहार संस्था, ग्रामीण यंत्रमाग संघ इत्यादी संस्थांच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केले. अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या आयुष्याचे कल्याण केले. इतकेच नव्हे तर जवळपास विविध विषयावर 50 पुस्तके लिहून साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय नाव कमविले आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाची 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. 81 वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे. याचे औचित्य साधून गडहिंग्लज उपविभागातील सर्व शाळांना एक रोप व एक पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ॲड. दिग्विजय कुराडे यांनी सांगितले.


