Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला जागरूक व्यापाऱ्यांमुळे तोतया अधिकाऱ्यांचा पर्दाफाश

तपासणीच्या नावाखाली बेकरी, स्वीट मार्ट व्यवसायिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न 


व्यापारी व नागरिकांनी दोघांना बेदम चोप देत केले पोलिसांच्या हवाली 


कर्नाटकातील चौघांची तोतया अधिकाऱ्यांची टोळी 


दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात ; दोघेजण पसार  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रीय अन्न व भेसळ नियंत्रण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून गडहिंग्लज शहरातील बेकरी व स्वीट मार्ट व्यवसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या कर्नाटकातील चौघा तोतया अधिकाऱ्यांचा जागरूक व्यापाऱ्यांमुळे पर्दाफाश झाला. दोघांना व्यापारी व नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. तर यातील दोघेजण पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आयुबअली हुसेनसाब तल्लूर ( रा. शिंदीकुरबेट, ता. गोकाक, जि. बेळगाव) व संतोष पांडुरंग तवेर (रा. हुक्केरी, जि. बेळगाव) या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.



याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी गडहिंग्लज शहरात कारमधून चौघेजण बाजारपेठेत फिरत होते. त्यांच्या कारवर 'ऑल इंडिया कौन्सिल ऑफ ह्यूमन राइट्स' अशी इंग्रजी व कन्नड भाषेत पाटी लावलेली होती. हे चौघे शहरातील संकेश्वर रोडवर असणाऱ्या काही बेकरी व दुकानांमध्ये जात आपण राष्ट्रीय अन्न व भेसळ नियंत्रण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत दुकानाचा परवाना व विक्रीस ठेवलेल्या पदार्थांची तपासणी करण्याचा बहाणा केला व या व्यवसायिकांकडून पैसे उकळले. शहरातील किमान पाच ते सहा बेकरीत ते गेले होते. त्यानंतर हे तोतया अधिकारी शेंद्री रोडवर बिरोबा देवालयानजीक  फरसाणा व बेकरी पदार्थ तयार करणाऱ्या एका कारखान्यात जाऊन तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मालात भेसळ असल्याचे सांगून तेथेही पैसे देण्याची मागणी केली. कारवाईला घाबरून काही व्यवसायिकांनी पाचशे ते हजार रुपये या तोतया अधिकाऱ्यांना दिले देखील.




दरम्यान, गडहिंग्लज शहरात काही अधिकारी आले असून ते बेकरी व्यवसायिकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना काही व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे तातडीने व्यापारी असोसिएशन  व बेकरी स्वीट मार्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांचा शोध घेत त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी करत चौकशी केली. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने तोतया अधिकारी असल्याचे उघड झाले. त्यामुळे तेथील नागरिक व व्यापाऱ्यांनी यातील दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिक चोप देत असल्याचे पाहून या टोळीतील दोघेजण तेथून पसार झाले. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या तोतया अधिकाऱ्यांनी वापरलेली कार व दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.