खेळण्या-बागडण्याच्या वयातच काळाने हिरावून नेले
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील दिवंगत हॉटेल व्यवसायिक राहुल पाटील यांचा मुलगा राजवीर पाटील (वय ११) याचे निधन झाले. ताप आल्याचे निमित्त झाले आणि खेळण्या बागडण्याच्या वयातच राजवीरचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण गडहिंग्लजकर हळहळले.
राजवीराला चार दिवसापूर्वी ताप आला होता. त्यामुळे गडहिंग्लज येथील बालरोगतज्ञांकडे तपासणीसाठी त्याला नेण्यात आले होते. मात्र तपासणी सुरू असताना त्याला अचानक भोवळ आल्यानंतर तो कोमात गेला होता. त्यामुळे त्याला तातडीने कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले होते. तब्बल तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
राजवीर हा कुडित्रे येथील डी. सी. नरके स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शाळेला सुट्टी पडल्याने तो आजोबा ॲड. विश्वनाथ पाटील यांच्याकडे गडहिंग्लजला आला होता. मात्र त्याला अचानक ताप आल्याचे निमित्त झाले आणि यातच त्याचे निधन झाले. राजवीरचे वडील हॉटेल चालक राहुल पाटील यांचे तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. राजवीरच्या अकाली निधनाने पाटील परिवाराला व राहुल पाटील यांच्या मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे.

