गडहिंग्लज शहरातून काढण्यात आली प्रभातफेरी
राष्ट्राच्या उद्धारासाठी, एकता व शांततेसाठी केली विशेष प्रार्थना
छायाचित्र : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद गडहिंग्लज शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. निमित्त शहरात विविध कार्यक्रम पार पडले.
सकाळी गडहिंग्लज शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीची सुरुवात नागेश चौगुले, बसवराज खणगावे, अरविंद बारदेस्कर, नरेंद्र भद्रापूर, उदय परीट, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
ही प्रभात फेरी सुन्नी जुम्मा मशिदीपासून सुरू करण्यात आली. लक्ष्मी मंदिर रोड, नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुल्ला मशीद, मुख्य बाजारपेठ, वीरशैव चौकमार्गे काढण्यात अली. या प्रभात फेरीत तिरंगी फुगे, मक्का मदिनेची प्रतिकृती व इस्लामिक झेंडे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी हबीब मकानदार, सलीम खलिफ, अमिरअली मुजावर, नदीम शेख आदींनी नाथपठण, कलमापठण केले. शाहरूख मुल्ला यांनी राष्ट्राच्या उद्धारासाठी एकता व शांततेसाठी, विशेष प्रार्थना केली.
यावेळी प्रा. सुनील शिंत्रे, आप्पा शिवणे, गुंडू पाटील, सिद्धार्थ बन्ने यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मशिदीचे अध्यक्ष मंजूर मकानदार, उपाध्यक्ष ताहीर कोचरगी, खजिनदार अल्ताफ शानेदिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. प्रा. आशपाक मकानदार यांनी आभार मानले.








