शहर अंधारमुक्त करण्यासाठी करणार आंदोलन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्युत बिल भरण्याच्या कारणावरून गडहिंग्लज शहरातील बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करून शहर अंधारमुक्त करण्यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने दिनांक ६ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथील दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण शहर अंधारात आहे. पथदिव्यांच्या लाईट बिलाच्या कारणावरून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील जनजीवनावर याचा परिणाम होत आहे. रस्त्यावर अंधारामुळे होणारे अपघात आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब नागरिकांसाठी अतिशय धोकादायक आहे. त्यातच गणेश चतुर्थी सण हा मोठया प्रमाणात साजरा केला जातो मात्र मुख्य रस्त्यावरील वरील पथदिवे बंद असलेने गणरायाच्या आगमनाला व अनंत चतुर्थीला नागरिकांना या अंधाराचा खूप मोठा त्रास होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर नागेश चौगुले, राजेंद्र तारळे, प्रा. सुनील शिंत्रे, सौ. स्वातीताई कोरी, राजेंद्र गड्ड्याणावर, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, सिद्धार्थ बन्ने, संजय संकपाळ, संतोष चिकोडे, बसवराज आजरी, प्रीतम कापसे, प्रभात साबळे, केम्पपान कोरी, युवराज बरगे यांच्या सह्या आहेत.



