मेडलाईन इंडिया व संवेदना ग्लोबल क्लासरूमचा कौतुकास्पद उपक्रम
आजरा : कन्या विद्या मंदिर उत्तूर व केंद्रीय शाळा उत्तूर या शाळांसाठी 14 लॅपटॉपचे मोफत वितरण मेडलाईन इंडिया कंपनी व संवेदना फाऊंडेशन यांच्यामार्फत वाचन प्रेरणा दिनी करण्यात आले.
उदघाटन संवेदना फाऊंडेशन आजराचे अध्यक्ष सरपंच किरण आमणगी, पांडुरंग मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच सौ. समीक्षा देसाई, ग्रामपंचायत सदस्य भैरू कुंभार, महेश करंबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक, विद्यार्थी व सर्व शिक्षक, संवेदना फाऊंडेशनचे उत्तूर विभागातील सर्व शिलेदार, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रांगोळ्यांनी परिसर सुशोभित करण्यात आला होता. ढोलाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संवेदना फाऊंडेशन यांनी आपल्या मार्फत चालणाऱ्या विविध सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेच्या बालचमूंनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक अनिल बामणे यांनी प्रास्ताविकात आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात मुलांच्या शिक्षणासाठी संगणक व त्याच्या विविध शाखांचे शिक्षण किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. त्याचबरोबर या ग्लोबल क्लासरूमचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग मोहिते यांनी संवेदना फाउंडेशनच्या कार्याकडे आपण कसे वळलो, आपल्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली याचे अनुभव सांगितले. नूतन केंद्रप्रमुख संतोष बिल्ले यांचेही स्वागत करण्यात आले. लॅपटॉप जरी मोफत मिळाले असले तरी ग्लोबल क्लासरूमसाठी आवश्यक लाईट फिटिंग, टेबल, खुर्च्या त्याचबरोबर कीबोर्ड, माऊस, डिजिटल बोर्ड, वर्गाची रंगरंगोटी यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी योगदान दिले आहे. अशा सर्व देणगीदारांचा यावेळी गुलाब पुष्प आणि आभार पत्र देवून सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मेघाराणी भाईंगडे, पूजा उत्तूरकर, प्रियांका उत्तूरकर, रोहिणी गोरे, चिंतन कांबळे, वर्षा परीट, तेजस्विनी पाटील, राजू देशमाने, गौरी सुतार, भैरू कुंभार, महेश करंबळी, सचिन उत्तूरकर, उमेश पटेल, रंजीत कुंभार, संदीप चव्हाण,चंद्रशेखर पाटील, संदीप भोसले, सौ. राजश्री घोडके, अमितकुमार भाईंगडे, मच्छिंद्र डवरी, व सर्व शिक्षक यांनी आर्थिक मदत देवून ग्लोबल क्लासरूम उभारणी केली आहे. याचा उपयोग या शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. दिनकर खवरे यांनी सूत्रसंचालन केले. कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संतोष गुरव यांनी देणगीदारांना आभार पत्र प्रदान केले. सुभाष आजगेकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक अनिल बामणे, संतोष गुरव, सुभाष आजगेकर, संतोष शिवणे, दीपक कांबळे, दिनकर खवरे, शिवाजी कुदळे, प्रशांत पाटील, दिलीप राजदीप, सौ अलका बामणे, सोनाली पाटील, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.




