औरनाळच्या कृष्णाई शैक्षणिक भरतीपूर्व प्रशिक्षण सामाजिक अकॅडमीत सत्कार समारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सतत डोळ्यात तेल घालून जागृतपणे आपल्या सीमेचे रक्षण जवान करीत असतात. माझा देश, माझ्या घरादाराची तसेच मुला माणसांची काळजी घेतो. जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणाची काळजी घेतो. लष्करी जीवन हा सुद्धा जीवन जगण्याचा खडतर मार्ग असून देशसेवेसाठी प्रचंड मेहनत, कणखरपणा, अपार मनोबल, धाडस, व चिकाटीच्या गुणावर खडतर आव्हान पेलता येते असे प्रतिपादन माजी उपप्राचार्य चिदानंद कानडे यांनी कृष्णाई शैक्षणिक भरतीपूर्व प्रशिक्षण सामाजिक अकॅडमी औरनाळ आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी कृष्णाई अकॅडमीचे अध्यक्ष प्रा. श्रीपती सावंत होते.
संपत सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सिद्धिविनायक महाडिक यांची सैन्यदलात निवड झाल्याबद्दल प्रा. चिदानंद कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिडदुग्गी हायस्कूल हिडदुग्गीच्या मुख्याध्यापकपदी सतीश रेडेकर यांची निवड झाल्याबद्दल प्रा. श्रीपती सावंत यांच्या हस्ते सत्कार झाला. सिद्धिविनायक महाडिक, सतीश रेडेकर व अजिंक्य कोकितकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी मेजर रविंद्र चव्हाण, चंद्रकांत नाईक यांच्यासह प्रशिक्षणार्थी, पालक उपस्थित होते. विक्रांत गुरव यांनी आभार मानले.



