गडहिंग्लज (प्रतिनिधी): आशीर्वाद कॉमर्स अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच डॉ. आनंद महाराज गोसावी व डॉ. नागेश पट्टणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री गजानन नागरी पतसंस्था गडहिंग्लज येथे संपन्न झाला.
बारावी, सीए फाउंडेशन, सीए इंटरमीडिएट, सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस फायनलसाठी गेलेल्या 27 विद्यार्थ्यांचा सत्कार आशीर्वाद कॉमर्स अकॅडमीतर्फे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन करण्यात आला.
यावेळी यशामध्ये सातत्य ठेवण्यासाठी सतत परिश्रम करण्याची गरज आहे त्याचप्रमाणे अभ्यास करताना तो स्मार्ट कसा करता येईल याबाबत डॉ. नागेश पट्टणशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.
अभ्यास करताना मन शांत ठेवून तो केल्यास यश हमखास मिळते हे सांगत विज्ञान अध्यात्म आणि अभ्यासाची जोड अतिशय सोप्या शब्दांमध्ये सांगून डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले.
यावेळी बारावीमध्ये तसेच विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या अकॅडमीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सुनील देसाई, सी. एस. मठपती, लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलचे अध्यक्ष रफिक पटेल, महावीर मरजे, कोटा अकॅडमीचे सीईओ सुनील गुरव, गजानन पतसंस्थेचे संचालक वाय. बी. कुलकर्णी, लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलचे सदस्य, विविध मान्यवर, पालक, विद्यार्थी, डॉ. आनंद महाराज गोसावी यांचे शिष्यपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक अमित कुलकर्णी यांनी केली तर आभार कु.आर्या मोरे हिने मानले. कार्यक्रमास गजानन नागरी पतसंस्था यांचे विशेष सहकार्य लाभले. आशीर्वाद कॉमर्स अकॅडमीच्या बारावी व सीएच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

