Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना भरपाई द्या !

ग्राहक पंचायतीचे आजरा-गडहिंग्लज- चंदगड-भुदरगड विभाग प्रमुख शिवाजी गुरव यांची मागणी 





आजरा : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी ग्राहक पंचायतीचे आजरा-गडहिंग्लज- चंदगड-भुदरगड विभाग प्रमुख शिवाजी गुरव यांनी आजरा तहसिलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.



या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड अवकाळी पाऊस पडला असून अजूनही पाऊस पडत आहे. हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. काढणी पश्चात सतत पावसामुळे पिकांची वाळवणी होत नाही त्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीनसह सर्वच खरीप हंगामातील पिके खराब होत आहेत. भात पीक आडवे पडले असून भुईमुगाच्या शेंगांना जमिनीतच कोंब फुटत आहेत. शेंगा जरी पावसातून काढल्या तरी त्या वाळत नसल्याने त्यांना बुरशी येऊन शेंगदाणे कडवट व खराब होतात. तसेच जनावरांना भाताचे पिंजर वाळवून चारा म्हणून उपयोग केला जातो. परंतु यावर्षी जाग्यावर पिंजर कुजले आहे. सोयाबीन देखील जाग्यावर खराब झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 



सध्या  विधानसभेची धामधूम चालू झाली असल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी शेतकऱ्यांची भावना झाली असून शेतकरी कुजलेले पीक पाहून अक्षरशः बांधावर बसून रडत आहेत.

        


शासकीय यंत्रणा व विमा कंपनीकडून पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हातून वर्षभर कष्ट करून, मशागतीपासुन बियाणे, पेरणी, खते, कीटकनाशके इत्यादींसाठी केलेला खर्च आणि  हाताला आलेले पीक कुजून वाया गेले आहे. त्यामुळे पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

       



घातलेला खर्चसुद्धा निघत नाही. याच्यावर त्वरित शासकीय यंत्रणेने पंचनामे करून अहवाल मागवून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पिकविमा कंपनीला सुद्धा आदेश व्हावेत, एक रुपयामध्ये विमा, त्याचबरोबर स्वतंत्रपणे सोसायटीमार्फत विमा असे विमा उतरूनसुद्धा जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसेल तर हे  अन्यायकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवाजी गुरव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.