कागलमधून सौ. स्वातीताई कोरी तर चंदगडमधून बाळेश नाईक निवडणूक लढविणार
जनता दलाला 'परिवर्तन महाशक्ती' या तिसऱ्या आघाडीकडून देखील प्रस्ताव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जनता दलाने चंदगड, कागल, राधानगरी विधानसभा निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात जनता दल निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून कागलमधून माजी नगराध्यक्षा व जनता दलाच्या नेत्या सौ. स्वातीताई कोरी तर चंदगडमधून पक्षाचे तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जनता दलाला 'परिवर्तन महाशक्ती' या तिसऱ्या आघाडीने देखील संपर्क साधला असून त्यांनी देखील उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सौ. स्वातीताई कोरी यांनी सांगितले आहे.
कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सौ. स्वातीताई कोरी म्हणाल्या, प्रत्येक निवडणुकीत आपण कोणाचातरी प्रचार करतो. केवळ प्रचारापुरता जनता दलाचा वापर करून घेतला जातो. निवडणुका झाल्यानंतर आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जनता दलाची ताकद दाखवायची असेल तर या निवडणुकीत पक्षाने लढले पाहिजे अशी भूमिका सर्वच कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली आहे. त्यामुळे चंदगड, कागल, राधानगरी या तिन्ही मतदारसंघात आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही विचार करत आहोत. चंदगडमधून तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कागल मधून मी स्वतः निवडणूक लढवण्याचा विचार आहे. राधानगरी मतदारसंघात देखील जनता दलाचा प्रभाव आहे या ठिकाणी देखील सक्षम उमेदवार आहे.
महाविकास आघाडी आमचा फक्त प्रचारापुरता वापर करत असेल तर मग...
महाविकास आघाडीतून निवडणूक लढविण्याची आमची देखील इच्छा आहे, मात्र महाविकास आघाडी आमचा फक्त प्रचारापुरता व निवडणुकीसाठीच वापर करून घेणार असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आम्ही आमच्या तत्वांशी एकनिष्ठ आहोत. राज्यातील जनता दल सेक्युलर पक्ष हा भाजपसोबत आहे. मात्र आम्ही आजपर्यंत तत्त्वांनी, विचारांनी, निष्ठेनी धर्मनिरपेक्ष राजकारण करत आलो आहोत. त्यामुळे आमची तत्वे बदलून कोणत्याही धर्मांध पक्षासोबत जाणार नाही, ही आमची भूमिका असल्याने जनता दल म्हणूनच आमची वाटचाल सुरू आहे. स्वार्थासाठी आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. जातीयवादी पक्षाशी आमचं कधीच जमणार नाही. जर महाविकास आघाडी आमचा विचार करणार नसेल तर निश्चितपणे आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे, असे सौ. कोरी यांनी सांगितले.
जनता दलाला 'परिवर्तन महाशक्ती' या तिसऱ्या आघाडीकडून देखील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रस्ताव आल्याचे देखील सौ. कोरी यांनी सांगितले. मात्र जिल्ह्याचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे आम्ही नेतृत्व मानल्याने त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
चंदगड मध्ये तिसऱ्या पर्यायाची गरज : तालुकाध्यक्ष बाळेश नाईक
जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, चंदगडमध्ये महायुती व महाविकास आघाडीतील गोंधळ पाहता येथील जनतेला तिसऱ्या पर्यायाची गरज आहे. जनता दलाचे नेते स्वर्गीय ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. चित्री प्रकल्प, येणेचवंडी, तेरणी, वैरागवाडी, बड्याचीवाडी येथील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गडहिंग्लज येथे एमआयडीसी प्रकल्प आणली आहे. चंदगड खोऱ्यातील विविध प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आहे. त्यामुळे जनता आमचा पर्याय स्वीकारेल हा आम्हाला विश्वास आहे.



