Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

ऐन दिवाळीत भोई कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर 


दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले ; ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे दयानंद हणमंत भोई (वय 40) या तरुणाने नैराश्यातून दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात झाली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावरच घरातील कर्त्या पुरुषाने आपले जीवन संपविल्याने भोई कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्याने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. 



याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत दयानंद हा पत्नी व दोन लहान मुलांसह राहत होता. मुलगा इयत्ता दुसरीत  तर मुलगी अंगणवाडीत शिकते. दयानंदच्या आई- वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गावात थोडीफार शेती आहे मात्र कर्ज भागविण्यासाठी ही शेती काही वर्षासाठी इतरांना करण्यास दिली आहे. कर्जामुळे दयानंदला नैराश्य आले होते. यातूनच त्याला दारूचे व्यसन लागले. त्याचे कर्ज देखील पत्नीने फेडले होते. तरी देखील तो नैराश्येत होता. त्याला दारूचे अति व्यसन लागले होते. पत्नी व नातेवाईकांनी त्याला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समजावून देखील सांगितले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावातील बस स्टॅन्ड नजीक परशराम भोपळे यांच्या मालकीच्या इमारतीत  दयानंद हा झोपल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. 



तिथे जाऊन पाहिल्यानंतर त्याने तेथील जिन्याच्या वरील छताच्या लोखंडी हुकला टेलिफोन वायरच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचे दिसले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी पंचनामा केला. हलकर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला. शंकर भरमा भोई यांच्या वर्दीवरून या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग कुंभार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.