भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष अविनाश ताशिलदार यांची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाकडे वेधले लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): खरेदी दस्त करतेवेळी जमिन विकणाऱ्याच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून बनावट खरेदी दस्त करणाऱ्या टोळीची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष अविनाश ताशिलदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे. दरम्यान, हे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे यांना दिल्याचे श्री. ताशिलदार यांनी सांगितले.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्यातील रहिवाशी नोकरी निमित्त परदेशात सहकुटुंब स्थायिक असलेल्या व आजही आपली मिळकत इथेच असणाऱ्या कुटुंबाची व त्यांच्या हिश्याच्या जमिनीची पुरेपूर माहिती घेवून त्या मूळ जमीन मालकाच्या जागी बनावट कागदपत्रे बनवून, बनावट जमिन मालक तयार करून खरेदी दस्त पूर्ण करून जमिन नावावर करून घेणारी टोळी कार्यरत आहे.
सदर प्रकरणात श्रीनिवास गजानन देशपांडे व श्री भगवान नारायण चिटणीस यांची सामाईक मिळकत गट नं. ३८४/११ हिटणी येथे आहे. दोघेही नोकरी निमित्त सहकुटुंब बाहेरगावी असतात. नेमके याचाच फायदा घेत प्रथम सामाईक ६० गुंठे जमिनीची बेकायदेशिररीत्या फोड करून दोघेही हजर नसताना आठ अ फोडण्यात आला असून सदरची जमिन भगवान नारायण चिटणीस यांच्या नावावर करण्यात आली. त्यानंतर सदरची गट नंबर ३८४/११ ची ७/१२ व ८अ फोड करून खरेदीपत्र केलेले आहे. सदरचे ७/१२ व ८ अ हे तलाठी व सर्कल यांच्या आयडी पोर्टल असल्याशिवाय ७/१२ व ८ अ कसा निघाला तसेच मिळकतीचे इतर हक्कात कुळांची नावे नोंद असून देखील खरेदीपत्रावेळी त्यांची मान्यता न घेता खरेदीपत्र पुर्ण करण्यात आले आहे. सदर लिहून देणार हे नोकरीनिमित्त परगावी असतेवेळी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीपत्र केलेले आहे. जर बनावट आधार कार्ड केलेले असेल तर ऑनलाईन कसे केले गेले तसेच बनावट दस्त कॉम्प्युटरवर तयार करणारा व एडीट करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी. सदरील दोन्ही व्यक्ती नसताना सर्कल व तलाठी यांनी कोणाला नोटीस काढली. त्यासंबंधी चौकशी होवून माहिती मिळावी. दस्ताबद्दल चौकशी होवून सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
अशा बेकायदेशीर दस्त प्रकरणात भगवान नारायण चिटणीस यांच्या नावे बनावट जमिन मालक म्हणून कल्लाप्पा लगमान्ना नाईक (रा. हेब्बाळ का। नुल) यांनी खरेदी दस्त करून दिलेला आहे. या प्रकरणात सर्व संबंधितांची सखोल चौकशी होवून त्यांच्यावर त्वरीत कडक कारवाई व्हावी अशी मागणी श्री. ताशिलदार यांनी या निवेदनातून केली आहे.


