मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी काढली सायकल रॅली
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी महसूल विभाग, पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने गडहिंग्लज येथील रावसाहेबआण्णा कित्तुरकर ज्युनिअर कॉलेज, डॉ. घाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथे पथनाट्याद्वारे मतदारांना मतदानाविषयी जनजागृती केली. छोटे-छोटे प्रसंग सादर करत मतदानाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. दरम्यान, यावेळी तेरणी मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
चंदगड विधानसभा मतदारसंघात सध्या मतदार जनजागृतीची मोहीम जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमधील रावसाहेबअण्णा कित्तुरकर ज्युनिअर कॉलेज व डॉ. घाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या पथनाट्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी विविध प्रसंगाचे सादरीकरण करत नागरिकांना विचार करायला भाग पाडले. छोट्या- छोट्या प्रसंगातून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. आपण मतदान करत असताना कोणत्याही आमिषांना, भूलथापांना बळी पडू नका, आपले मत विकून आपली किंमत कमी करू नका असा संदेश या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला.
या पथनाट्याचे दिग्दर्शन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो मतदानाचा धागा हो, मतदान आपला अधिकार आणि जबाबदारी, वृद्ध असो वा जवान सर्वजण करा मतदान, आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विस्तार अधिकारी श्री. कासार, आर. एन. पाटील, श्री. कोलनकर, श्री. बागडी, तेरणी मराठी विद्यामंदिरचे शिक्षक रमजान अंकली, कामाना नाईक, सकरू भोसले, यांच्यासह इतर शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.



