Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा!

'सारथी'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांचे वन मंत्र्यांना निवेदन 


आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील समस्येकडे वेधले लक्ष  


'हत्तीग्राम' प्रकल्प युद्धपातळीवर राबवावा, नुकसानीची योग्य भरपाई देण्याची केली मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आजरा, चंदगडसह गडहिंग्लज तालुक्याच्या काही भागात वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान व उपद्रव टाळण्यासाठी शासन स्तरावरून ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात भरपाई देण्यात यावी अशी मागणी सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी वनमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 



या निवेदनात म्हटले आहे की, आजरा, चंदगड आणि त्या पाठोपाठ गडहिंग्लजच्या काही भागात गेल्या दोन दशकापासून वन्यप्राण्याकडून शेतीचे प्रचंड नुकसान दरवर्षी होत आहे. या प्रश्नाबाबत शासनाकडे वारंवार लक्ष वेधलेले आहे. कर्नाटकातून येणारे हत्तीचे कळप चंदगड मार्गे थेट गोव्यापर्यंत जात असतात. त्यांचा हा मार्ग शेकडो वर्षापासून असल्याची माहिती मिळते. या हत्तीकडून चंदगड, आजरा या तालुक्यात दरवर्षी धुमाकूळ सुरू असतो. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होवून शेती उद्योगाला फटका बसतो. हत्तीच्या बंदोबस्तासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आली. त्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च झाला. परंतू हत्तींचा बंदोबस्त झालेला नाही. अद्यापही दरवर्षी हत्तीकडून प्रचंड प्रमाणात नुकसान सुरूच आहे. मध्यंतरी हत्तीसाठी संरक्षित क्षेत्र म्हणजेच हत्ती ग्राम उभारण्याचा शासनाचा विचार होता. त्यासाठी आंबोली परिसरात हत्तीग्राम उभारण्याचे शासनाने जाहिर केले होते. यापूर्वी 'गो बॅक एलिफंट' नावाने विशेष मोहिम राबविली होती. याशिवाय कर्नाटक शासनाच्या सहकार्याने संयुक्त मोहिम राबविली त्यांचा काहिच उपयोग झालेला नाही.



हत्ती प्रमाणेच गव्यांचे कळपसुध्दा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेले आहेत. शेतीच्या नुकसानीबद्दल वनखात्याकडून मिळणारी भरपाई अत्यंत तोकडी आहे. शेतकरी वर्ग याप्रकाराने हैराण आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या विषयावर अध्यक्षपदावर असताना या प्रश्नात लक्ष घालून शासनाला निर्देश दिले होते. परंतू प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे वन विभागाकडून या संदर्भात सर्व माहिती घेऊन वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आराखडा तयार करण्यात यावा तसेच हत्तीग्राम सारखा प्रकल्प युद्धपातळीवर राबविण्यात यावा, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची योग्य प्रमाणात  भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.