५०० पेक्षा अधिक विद्यार्थी व मतदारांचा सहभाग
गडहिंग्लज (प्रतिनिधी): 271 चंदगड व 273 कागल विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदार जनजागृतीसाठी गडहिंग्लज मध्ये 'लोकशाही दौड' अतिशय शिस्तबद्धपणे पार पडली.
शहरातील शिवाजी पुतळ्यापासून लोकशाही दौडला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा व फलक दाखवून मतदारांचे प्रबोधन केले. "मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, तुमचे पहिले मतदान म्हणजेच तुमच्या तारुण्याचे पहिले पाऊल, जागरूक मतदार लोकशाहीचा आधार, चला मतदान करूया लोकशाही रुजवूया, तोच देश होईल महान या देशात शंभर टक्के मतदान, वृद्ध असो किंवा जवान सर्वजण करा अवश्य मतदान, वाढवू तिरंग्याची शान करुया देशासाठी मतदान."अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. ही दौड भगवा चौक-चर्च रोड -भगवा चौक-एम.आर.हायस्कूल-संकश्वर रोड येथून दसरा चौकात समाप्त झाली.
या दौडमध्ये अभिनव अकॅडमी, एम. आर. हायस्कूल, गडहिंग्लज हायस्कूल, जागृती हायस्कूल व कृष्णाई अकॅडमी मधील विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, अग्निशमन दल व विद्युत वितरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही दौडचे आयोजन स्वीप पथक नोडल अधिकारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य संजय कुंभार, अनिल बागडी, अमोल पाटील, संपत सावंत, संजय भांडुगरे ,आर.एन. पाटील, राजेंद्र देसाई, सलीम मुल्लानी, देवदत्त कांबळे, प्रकाश हरकारे, रमेश कुंभार यांनी मतदान जनजागृती दौडचे संपूर्ण नियोजन केले.




