युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा
महाराष्ट्र पोलीस उपविजेता; केरळ तृतीय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अटीतटीच्या झालेल्या अंतिम फुटबॉल सामन्यात मुंबईच्या बडोदा बँकेने महाराष्ट्र पोलीसचा टायब्रेकरवर ४-३ असे नमवून विजेतेपदासह रोख ७५ हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा युनायटेड चषक पटकाविला. केरळ एजी क्लबने गोव्याच्या एफसी गोवा अँकाडमीला सडनडेथमध्ये ४-३ असे हरवून तृतीय क्रमांकासह रोख ३० हजारांचे पारितोषिक पटकाविले. दोन्हीं सामन्यात निर्धारित वेळेसह टायब्रेकरचा थऱार अनुभवयाला मिळाल्याने उपस्थित दहा हजाराहून अधिक शौकीनांची अपेक्षापूर्ती झाली. येथील गडहिंग्लज युनायटडे फुटबॉल असोसिएशनमार्फत गेले पाच दिवस एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर या स्पर्धा सुरु होत्या.
अंतिम सामन्यात दोन्ही संघ मुंबईचे असल्याने सामना चढाया प्रतिचढायांनी रंगला. सामन्याच्या मध्यंतर पुर्वी पोलीसच्या खेळाडूला गोल क्षेत्रात अवैध रोखल्याने पंचानी पेनल्टी दिली. पण, दिपक पाटीलचा फटका बडोदा बँकेचा गोलरक्षक रोहित पाटीलने अचुकपणे अडवित संघावरील संकट टाळले. उत्तरार्धात ६५ व्या मिनिटाला बडोदा बँकेच्या सुनिल गुरंगने कॉर्नरच्या संधीवर उत्कृष्ठ गोलची नोंद केली. ८५ व्या मिनिटाला बडोदा बँकेच्या बचावपटूचा हँड झाल्याने पोलीसांना पेनल्टी मिळाली. या बरोबरीच्या सुवर्णसंधीचा पुरेपुर फायदा उठवत पोलीसच्या हुकमी खेळाडू हिमकेत डेंभरेने गोल करून सामना १-१ असा केला. टायब्रेकरमध्ये बदोडाच्या डेंन्झिंल मस्करनेस, ओवीस अन्सारी, वासिफ शेख, सिंध्दात शेट्टी यांनी तर पोलीसच्या सुयश हंडे, हिमकेत डेंभरे, दिपक पाटील यांनाच गोल करता आला. बडोदा बँकेचा बदली गोलरक्षक याकीबखान याने शेवटचा पेनल्टीचा फटका अडवून संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला.
रवळनाथ हौसींगचे एम. एल. चौगुले, सतीश घाळी, काशिनाथ शिंदे, युवराज कित्तुरकर, विनोद बिलावर, डॉ अमोल पाटील, मोहन कांबळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी, गुंडू नाथ बुआ, रविंद्र मोरे, संजय खोत, संभाजी शिवारे, महादेव पाटील, प्रशांत दड्डीकर, मनिष कोले उपस्थित होते. स्पर्धा संयोजक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी स्पर्धा समन्वयक सुल्तान शेख, पंच यासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी आभार मानले. ललित शिंदे, भुपेंद्र कोळी यांनी सुत्रसंचलन केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट...
स्पर्धावीर- डेन्झींल मस्करनेस ( बडोदा बँक)
गोलरक्षक- रोहन पाटील ( बडोदा बँक)
बचावपटू- दिपक पाटील ( महाराष्ट्र पोलीस)
मध्यरक्षक- लिओ निरोज ( एफसी गोवा)
आघाडीपटू- हिमकेत डेंभरे ( महाराष्ट्र पोलीस)
शौकीनांची शिस्त...
तृतीय आणि अंतिम सामन्यात पोहचलेल्या संघानी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केल्याने आज दुपारपासूनच एम. आर. हायस्कुलचे मैदानाला शौकीनांच्या गर्दीचा महापूर आला होता. त्यातच गोल आणि परतफेड यामुळे शौकीनांची उत्कंठा वाढत गेली. त्यातच दोन्हीं सामन्याचा निकाल टायब्रेकर पर्यंत लांबला. तरीही, कोणताही बंदोबस्त नसतानाही स्थानिक शौकिनांनी अत्यंत शिस्तबद्ध पणे सामने पाहून गडहिंग्लजकरांची शिस्तीची परपंरा कायम ठेवली.

