Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगडची चुरशीची लढाई कोण जिंकणार, हे मतदारच ठरवणार

रिंगणातील सर्वच दिग्गज उमेदवार करतायेत विजयाचा दावा 


चंदगड विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुमधडाका सुरू 




संतोष नाईक 

गडहिंग्लज: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापले आहे. यंदा कधी नवे ते एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातच महायुती व महाविकास या दोन्हीही आघाड्यांमधील बंडखोर अपक्ष उमेदवारांमुळे अटीतटीच्या व चुरशीच्या लढती होत आहेत. प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ते गुलाल आमचाच, विजय आमचाच असा दावा करत असला तरी नेमके मतदारांच्या मनात काय दडलय? यावरूनच रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.


 कसा आहे हा मतदारसंघ ?


271 चंदगड विधानसभा मतदार संघाचा विचार करता या ठिकाणी एकूण 390 मतदान केंद्र आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 62 हजार 310, महिला मतदार संख्या 1 लाख 62 हजार 610 तर नऊ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण मतदार संख्या 3 लाख 24 हजार 929 इतकी आहे. या मतदारांमध्ये 2110 इतके सैनिक मतदार आहेत. त्यात 2021 पुरुष व 59 महिला मतदारांचा समावेश आहे. 


 वयोगटनिहाय अशी आहे मतदार संख्या  


एकूणच मतदारांचा विचार केल्यास चंदगड मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 7232, 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 62 हजार 143, 30 ते 39 वयोगटातील मतदारांची संख्या 65 हजार 151, 40 ते 49 वयोगटातील मतदारांची संख्या 66 हजार 473, 50 ते 59 वयोगटातील मतदारांची संख्या 53 हजार 890, 60 ते 69 वयोगटातील मतदारांची संख्या 38 हजार 71, 70 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 22822, 80 ते 89 वयोगटातील मतदारांची संख्या 7770, 90 ते 99 वयोगटातील मतदारांची संख्या 1263 तर 100 व त्यापुढील वयोगटातील मतदारांची संख्या 115 इतकी आहे. तर दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 3316 इतकी आहे.


 2019 निवडणुकीचा फ्लॅशबॅक 


मागील म्हणजेच 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीचा फ्लॅशबॅक बघितला तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश पाटील हे 55 हजार 558 मते मिळवून विजयी झाले होते. त्या निवडणुकीत सध्या महायुतीतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनी 51 हजार 173 इतकी मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी देखील त्यांना पाण्याची टाकी हेच चिन्ह होते, आता देखील याच चिन्हावर ते निवडणूक लढवीत आहेत. त्या पाठोपाठ आता महाविकास आघाडीतून बंडखोरी करत राजर्षी शाहू समचारी आघाडीतून निवडणूक लढवणारे विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी त्यावेळी वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवीत 43 हजार 973 इतकी मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्या वेळचे चित्र पाहता अपक्षांना धरून एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात असून तीन उमेदवारांची भर पडली आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार या चंदगड मतदारसंघात आहेत. बंडखोरी व अपक्ष उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार यात मात्र शंका नाही. त्यामुळे रिंगणातील दिग्गज उमेदवारांना एकेका मतासाठी कंबर कसावी लागणार आहे.


कोण उमेदवार ? कोणत्या आधारावर निवडणूक रिंगणात 


 महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील




यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी या मतदारसंघात केलेल्या उच्चांकी 1600 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. आतापर्यंत झालेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. शांत, संयमी, सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे साधे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. वडील माजी आमदार स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत चंदगड भागाच्या विकासासाठी दिलेले योगदान हे देखील जमेची बाजू आहे. गेल्या पाच वर्षात विकास कामातून एक वेगळी ओळख आमदार राजेश पाटील यांनी निर्माण केली आहे. भविष्यात पुन्हा दुपटीने विकास कामे व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा संकल्प आहे.



महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर 




महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर हे माजी राज्यमंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या आहेत. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध विकास कामे तसेच या विभागातील विविध पाणी प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहेत. विशेष करून आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प पूर्ण करून हिरण्यकेशी नदी बारमाही वाहती ठेवली आहे. विकास कामांच्या जोरावरच त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती संध्यादेवी कुपेकर (आई साहेब ) यांनी स्वर्गीय कुपेकर यांचे मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर खंबीरपणे उभ्या होत्या. आज देखील डॉ. बाभुळकर ह्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केलेली विकास कामे व कुपेकर प्रेमी जनतेच्या पाठबळावर निवडणूक रिंगणात आहेत. चंदगड तालुक्यातील प्रदूषणकारी एव्हीएच प्रकल्प हद्दपार करण्यात डॉ. बाभुळकर यांचे मोठे योगदान आहे. ते स्वतः उच्च विद्याविभूषित असून बालरोग तज्ञ आहेत. माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा त्यांचा संकल्प आहे. 



 अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील 



महायुतीतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नेते आहेत. राज्यातील माथाडी कामगारांच्या संघटनेचे नेतृत्व देखील ते करतात. चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्याचा संकल्प घेऊन ते निवडणूक रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना भरभरून मते दिली होती. थोडक्या मतानी त्यांचा पराभव झाला होता. दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांना आत्मविश्वास आहे. गेली पाच वर्षे त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना विकास कामांसाठी निधी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मतदार संघाशी सातत्याने त्यांनी संपर्क ठेवला आहे. येथील बेरोजगार युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम व सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावणे हा त्यांचा संकल्प आहे.



राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील 




विनायक उर्फ आप्पी पाटील हे राजर्षी शाहू समविचारी आघाडीतून निवडणूक लढवीत आहेत. महाविकास आघाडीतून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला. चंदगड तालुक्यातील काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, बळीराजा संघटनेचे नेते नितीन पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे कॉम्रेड संपत् देसाई, ठाकरे पक्ष शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर यांच्या मदतीने राजर्षी शाहू समविचारी आघाडी उभारून ते निवडणूक लढवीत आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या जोरावरच ते निवडणूक रिंगणात आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा संकल्प आहे.



जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार उद्योजक मानसिंगराव खोराटे 




उद्योजक मानसिंगराव खोराटे यांची यंदा नव्यानेच या मतदारसंघाच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर जनसुराज्य शक्ती पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. मानसिंग खोराटे हे साखर कारखानदारीतील मोठे उद्योजक आहेत. चंदगड तालुक्यातील दौलत कारखाना त्यानी चालवायला घेतला आहे. गेल्या पाच वर्षात विविध संकटे  व अडथळ्यांना तोंड देत त्यांनी दौलत साखर कारखाना उत्कृष्टरित्या चालवला आहे. या पाठोपाठच त्यांनी सोलापूर व लातूर येथील दोन कारखाने विकत घेतले आहेत. अशा एकूण तीन कारखान्यांचा मोठा डोलारा ते यशस्वीरित्या सांभाळत हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उद्योजक मानसिंग खोराटे यांची शून्यातून सुरू झालेली वाटचाल व त्यांनी प्रामाणिकपणे केलेली प्रगती सर्वांनाच थक्क करणारी आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील गावागावातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. या जोरावरच ते निवडणूक रिंगणात आहेत.


बाकी इतर अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहेत. या अपक्ष उमेदवारांना देखील त्यांच्या ज्या त्या भागात मते मिळणार आहेत. त्यामुळे या मतांची विभागणी होणार आहे.



 कोणाचा कोणाला पाठिंबा?


चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर हे आपल्या कार्यकर्त्यांसह  प्रचारात सक्रिय देखील झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजेश पाटील यांना चांगला फायदा होणार आहे. त्याचबरोबर भाजपचे नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांनी देखील राजेश पाटील यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे संग्रामसिंह कुपेकर यांच्या गटाचे राजेश पाटील यांना पाठबळ मिळाले आहे.



महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर यांना जनता दलाने पाठींबा जाहीर केला आहे. जनता दलाच्या नेत्या व माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात  जनता दलाची फिक्स मते असून याचा नंदाताईंना फायदा होणार आहे. त्याबरोबरच हलकर्णी येथील हत्तरकी गटाने देखील नंदाताईंना पाठिंबा जाहीर केल्याने हत्तरकी गटाचे पाठबळ त्यांना मिळाले आहे. 



अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना समाजरत्न डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी पाठिंबा जाहीर केले आहे. तालुक्याच्या पूर्व भागात डॉ. व्हसकोटी यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे याचा फायदा शिवाजीराव पाटील यांना होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी मतदारसंघातील माजी सैनिकांचा देखील स्वतंत्र मेळावा घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्याने याचा फायदा त्यांना होणार आहे.



एकंदरीत चंदगड विधानसभा मतदार संघातील यंदाची निवडणूक ही जिंकण्यासाठी कोणालाच सोपी नाही असे चित्र सध्या आहे. या मतदारसंघातील विविध वयोगटातील मतदारांचे विविध प्रश्न  व त्यांच्या समस्या सोडवण्याची खात्री असणाऱ्या उमेदवारालाच मतदारांची प्रथम पसंती असेल यात मात्र शंका नाही. त्यामुळे सर्वच उमेदवारांना विजयासाठी जंगजंग पछाडावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.