चंदगड विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत
गडहिंग्लज (संतोष नाईक ) : अर्ज माघारीच्या आजच्या दिवशी चंदगड विधानसभा मतदार संघात महायुतीतून बंडखोरी केलेले भाजपचे नेते शिवाजीराव पाटील व महाविकास आघाडीतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. एकूण आठ जणांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतल्याने 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरी दिग्गज उमेदवार पाहता पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आज मनीषा मानसिंग खोराटे ( अपक्ष), सुस्मिता राजेश पाटील ( अपक्ष), केदारी यल्लाप्पा पाटील ( अपक्ष), नारायण रामू वाईंगडे ( पिंजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), अण्णासाहेब विनायक पाटील (अपक्ष), गोपाळराव मोतीराम पाटील (अपक्ष), प्रकाश राजाराम कागले (अपक्ष), संग्रामसिंह कुपेकर (अपक्ष) या उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर, जनसुराज्य शक्ती पक्षातून मानसिंगराव खोराटे, अपक्ष शिवाजीराव पाटील, अपक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील, बहुजन समाज पार्टी कडून श्रीकांत अर्जुन कांबळे, वंचित बहुजन आघाडी कडून अर्जुन मारुती दुंडगेकर, संभाजी ब्रिगेड पार्टी कडून परशराम पांडुरंग कुट्रे, अपक्ष अशोक शंकर आर्दाळकर, अक्षय एकनाथ डवरी, संतोष आनंदा चौगुले, जावेद गुलाब अंकली, तुळशीदास लक्ष्मण जोशी, समीर महम्मदइसाक नदाफ, प्रकाश रामचंद्र रेडेकर, मोहन प्रकाश पाटील, रमेश सटूप्पा कुट्रे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
चंदगड विधानसभा मतदारसंघात आता पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार राजेश पाटील, अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंगराव खोराटे, अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील या दिग्गज उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार आहे.

