Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

२० तारखेला 'आधी तुतारी, मग भाकरी'

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे महिलांना निर्धार करण्याचे आवाहन  


महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारार्थ  महागाव येथे ताराराणी महिला महोत्सव


'दादागिरी' करणाऱ्या उमेदवारांना 'ताईगिरी' दाखवून देऊ : डॉ. नंदाताई बाभुळकर





गडहिंग्लज (प्रतिनिधी): तुम्हाला लहानपणापासून "तू मुलगी आहेस, तू महिला आहेस, तुला हे जमणार नाही" असं ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं त्या प्रत्येकाला आठवा व 20 नोव्हेंबरला 'आधी तुतारी मग भाकरी' हा निर्धार मनाशी बाळगून महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांना उत्स्फूर्तपणे मतदान करून महिलांची ताकद दाखवा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.



चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे आयोजित ताराराणी महिला महोत्सव कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे बोलत होते.




यावेळी बोलताना खासदार कोल्हे पुढे म्हणाले, आतापर्यंत 'जिच्या हाती पाळण्याची दोरी' असं लिहिलं जात होतं त्या महिला भगिनींना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळवून देऊन त्यांच्या हातात आता 'झेंड्याची दोरी' देण्याचे काम शरदचंद्र पवार यांनी केलं आहे. त्यामुळे आज गावची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या माध्यमातून शरदचंद्र पवार यांनी महिलांना स्वाभिमान मिळवून दिला आहे. राज्यातील सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारने महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे साफ चुकीचे असून उलट महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महिलांना महिन्याला पंधराशे ऐवजी तीन हजार रुपयांचे अर्थसाह्य, वर्षाला सहा गॅस सिलेंडर, अत्यल्प व्याजदराने पाच लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला महिला उमेदवार नंदाताई उभ्या आहेत, म्हणजे तुम्ही सर्वजण महिला उभे आहात, नंदाताई आमदार होणार म्हणजे तुम्ही प्रत्येक जण माता-भगिनी आमदार होणार आहात असे समजा व नंदाताईंच्या पाठीशी तुमची ताकद उभी करून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार कोल्हे यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र देखील सोडले.




'दादागिरी' करणाऱ्या उमेदवारांना 'ताईगिरी' दाखवून देऊ : डॉ. नंदाताई बाभुळकर 




महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, चंदगड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी शाश्वत विकास केला. त्यामुळे आज स्वर्गीय कुपेकर तसेच शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारी जनता माझ्या पाठीशी आहे. चंदगड मतदारसंघातील सर्व वाड्या वस्त्यांमधून मला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महिलांचा मोठा पाठिंबा आहे. मात्र चंदगड विधानसभा मतदारसंघात काहीजण 1600 कोटी रुपयांचा विकास केल्याचा कांगावा करत आहेत. त्यांनी नेमका कोणाचा विकास केला? हे सर्व जनतेला माहित आहे. चंदगड मधील विनाशकारी 200 कोटी रुपयांचा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी जनआंदोलन झाले. या जनतेच्या लढाईत तुम्ही कुठे होता? असा सवाल देखील नंदाताई यांनी विरोधकांना केला. मागील निवडणुकीत 'आमचं वाढलेलं ताट आम्ही दुसऱ्यांसमोर ठेवलं' मात्र याची जाणीव त्यांनी ठेवली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चंदगड तालुक्यात काहीजण दडपशाही, गुंडगिरी करत आहेत मात्र येथील स्वाभिमानी मतदार ही गुंडगिरी खपवून घेणार नाही. वेळप्रसंगी 'दादागिरी' करणाऱ्यांना आम्ही 'ताईगिरी' दाखवून देऊ असा इशारा देखील डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी यावेळी दिला. दरम्यान, यावेळी विरोधकांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा समाचार घेत 'जूडेंगे तो जितेंगे' हा नारा डॉ. बाभुळकर यांनी दिला. 



यावेळी ठाकरे शिवसेना पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जनता दलाच्या नेत्या प्रा. सौ. स्वातीताई कोरी, विष्णुपंत केसरकर, अश्विनी माने, नंदू गोरुले आदींची भाषणे झाली.



या महिला महोत्सवास माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, रामराजे कुपेकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमर चव्हाण, शिवाजीराव माने, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, उपतालुका प्रमुख वसंत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रेखाताई हत्तरकी, संभाजीराव देसाई शिरोलीकर, एम जे पाटील, नारायण वाईंगडे, बाळकृष्ण परीट, रचना होलम, मुकुंददादा देसाई, परशराम कांबळे, प्रशांत देसाई, मल्लिकार्जुन आरबोळे, विद्याताई पाटील, वसंत चांदुरकर, अरविंद कुरणे, रवींद्र घोलप, अंकुश रणदिवे, दयानंद कांबळे, अशोक तर्डेकर, अखलाकभाई मुजावर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.