महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ नेसरीत महाविजय निर्धार सभा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आमदार राजेश पाटील यांनी चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तिन्ही तालुक्यांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, सदाशिवराव मंडलिक, नरसिंगराव पाटील यांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे जपला आहे. त्यामुळे राजेश पाटील हे 'दमदार आमदार' आहेत, या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय निर्धार सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, चंदगड येथील दौलत साखर कारखाना आम्ही सक्षमपणे चालवून शेतकऱ्यांना न्याय देऊ. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नियोजित किटवडे प्रकल्प तसेच पर्यटनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी दुप्पट निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील म्हणाले, केवळ चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपण अजितदादा यांच्यासोबत गेलो, कोणाशीही दगाफटका केलो नाही. प्रत्येक क्षणी मी फक्त मतदारसंघातील वाड्यावस्तांच्या विकासाचा विचार करून वाटचाल करत आलो आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, हेमंत कोलेकर, संग्रामसिंह कुपेकर, दीपक पाटील, मुन्ना नाईकवाडी, युवराज पाटील, नामदेव निट्टूकर, सुभाष देसाई, अल्बर्ट डिसोझा यांची भाषणे झाली.
या मेळाव्यास रामाप्पा करीगार, प्रकाशराव चव्हाण, बाबासाहेब पाटील, भैयासाहेब कुपेकर, प्रकाश पताडे, जयसिंग चव्हाण, सुधीर देसाई, भिकू गावडे, सतीश पाटील, सुधीर देसाई, जयकुमार मुन्नोळी, सुनिता रेडेकर, हेमांगी देसाई, दिलीप कांबळे, बाबुराव चौगुले, दीपक जाधव, अनिकेत कोणकेरी, संतोष पाटील, एम.के.देसाई, अनिल फडके, राजू मुरकुटे, प्राची काणेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन दिलीप भेकणे यांनी केले. आभार अभय देसाई यांनी मानले.







