कोल्हापूर : गोकुळचे माजी अध्यक्ष रविंद्र पांडुरंग आपटे (वय ७१ रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी) यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवारी दुपारी १२ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या या निधनाने दूध व्यवसायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना जनतेने व्यक्त केली आहे.
रविंद्र आपटे यांनी प्रायव्हेट हायस्कूलमधील शिक्षणानंतर कोल्हापूर येथील कृषि महाविद्यालयातून बीएस्सी ॲग्री तर राहूरी कृषि विद्यापीठातून एमएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतले. रविंद्र आपटे यांना विदेशामध्ये नोकरीची मोठी संधी असताना देखील त्यांनी आजरा तालुक्यातील आपल्या शेतीमध्ये लक्ष घातले. येथे त्यांनी पहिल्यांदा संकरित गायी आणल्या. १९८६ पासून सलग ३५ वर्षे ते गोकुळचे संचालक आणि तीन वेळा त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. महानंदचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. गेली चार वर्षे कर्करोगाने ते आजारी होते.
आजरा तालुक्यातील जनता दूध संस्था, कोल्हापूर येथील ट्रान्सपोर्ट या संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कला, क्रीडा,सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ देण्याची त्यांची भूमिका होती. त्यांच्या पश्चात महालक्ष्मी बॅंकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका पदमजा आपटे यांच्यासह दोन मुले, सून आणि भाऊ सुधीर आपटे असा परिवार आहे. आज दुपारी १२ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

